अतिवृष्टीत शेतकऱ्यांना दिलासा! मुख्यमंत्री फडणवीसांचा घोषणा– 31 लाख शेतकऱ्यांना 2215 कोटींचा मदतीचा हात

मुंबई :राज्यातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. मोठ्या प्रमाणावर शेती, घरे तसेच जनावरांचे नुकसान झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. जिथे जिथे शेती, घरे किंवा जनावरांचे नुकसान झाले आहे, तिथे आवश्यक त्या ठिकाणी निकषांमध्ये शिथिलता आणून मदत केली जाईल. कोणत्याही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही.”
मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अधिकृत आकडेवारीनुसार, आतापर्यंत ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना २२१५ कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. त्यापैकी १८२९ कोटी रुपये जिल्हा स्तरावर वितरित करण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासनाला ही मदत तत्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले असून, पुढील ८ ते १० दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत रक्कम जमा होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. सोयाबीन, कापूस, मका, भाजीपाला आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील घरे कोसळली, जनावरांचा बळी गेला. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. मात्र सरकारकडून मिळणाऱ्या मदतीमुळे त्यांच्या हाताला दिलासा मिळणार आहे.
फडणवीस यांनी स्पष्ट केले की, मदत वितरणामध्ये कोणतीही ढिलाई किंवा अडथळा सहन केला जाणार नाही. प्रशासनाने पारदर्शकता राखून प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
सरकारच्या या निर्णयामुळे नैसर्गिक आपत्तीने त्रस्त शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण परतला आहे.