Maharashta Rain : राज्यात पाऊस परतणार, या जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट
 
पुणे: देशात मान्सूनवर यंदा अल निनोचा प्रभाव दिसून आला. यामुळे जून आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला नाही. जुलै महिन्यातील पावसाने काहीसा दिलासा दिला. पावसाळ्याचे तीन महिने संपले असताना राज्यातील धरणे भरलेली नाही. यामुळे आता सप्टेंबर महिन्यात कसा पाऊस पडणार? यावर यंदाची परिस्थिती अवलंबून आहे. सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाल्यास रब्बी हंगाम शेतकऱ्यांना घेता येणार आहे. तसेच धरणांमध्ये जलसाठा होणार आहे. आता हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या यलो अलर्ट दिला आहे.
कुठे दिला यलो अलर्ट
राज्यातील विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शनिवारी आणि रविवारी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. गडचिरोली, गोंदिया, भंडरा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, नागपूर, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात लातूर, नांदेड, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्येही यलो अलर्ट आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांत यलो अलर्ट दिला आहे.
पुणे, मुंबईत पाऊस
शनिवारी पुणे आणि मुंबईत पाऊस सुरु झाला आहे. पुणे जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मुंबई, नवी मुंबईत ढगाळ वातावरण आहे. काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. बेलापूर, जुईनगर, नेरुळमध्ये रिमझिम पाऊस पडत आहे.
रायगडमध्ये खोपोलीत पाऊस
रायगडमधील खोपोलीमध्ये शुक्रवारी रात्रभर पाऊस झाला. यामुळे इमारतीमध्ये आणि घरात पाणी शिरले. शुक्रवारी संध्याकाळपासून खोपोली शहर आणि खालापूरमधील ग्रामीण भागात पावसाची सतंतधार सुरु आहे. शिळगाव आणि कारमेल स्कूलच्या पाठीमागे मोगलवाडी परिसरातील सखल भागातील इमारतीमध्ये पाणी भरले.