Mumbai Rain Big Alert | समुद्राला उधाण, लाटा उंच उसळणार, वारे वेगाने वाहणार, मुसळधार पावसाचे संकेत
 
मुंबई | 21 जुलै 2023 : मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा ओघ पाहता प्रशासन सतर्क झालंय. सध्या तरी रेल्वे सेवा सुरळीत आहे. पण रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. विशेष म्हणजे कुर्ला रेल्वे स्थानकावर हार्बर मार्गावर पाणी साचल्याने जवळपास तासाभरापेक्षा जास्त वेळ वडाळा ते मानखुर्द रेल्वे सेवा ठप्प होती. याशिवाय वडाळा येथून पनवेलच्या दिशेला जाणाऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हार्बर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. असं असताना मुंबईतला पाऊस थांबेल अशी चिन्हं नाहीत. कारण पुढचे काही तास खूप महत्त्वाचे आहेत.
हवामान विभागाने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय. विशेष म्हणजे पुढचे काही तास महत्त्वाचे आहेत. कारण पुढच्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. समुद्रात उधाण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अंधेरीचा सबवे आज दुपारी पाणी साचल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. याशिवाय सखल भागांमध्ये पाणी साचल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याचा धोका निर्माण झालाय. हवामान विभागाकडून याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
समुद्राला उधाण, वारे 40 ते 45 प्रतिसाताच्या वेगाने धावणार
मुंबईत पुढच्या काही तासांसाठी महत्त्वाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढच्या काही तासांमध्ये 45 ते 55 किमी प्रतितासाच्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच समुद्रालादेखील उधाण येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, समुद्राच्या लाटा 4.21 मीटरच्या उंचीने उसळण्याची शक्यता आहे.
मुंबईतील सायन परिसरात मुसळधार पाऊस बरसल्यामुळे रस्ता जलमय झालाय. त्यामुळे वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झालाय. दादर-हिंदमाता परिसरात पाणी भरायला सुरुवात झालीय. पावसाचा जोर अधिक असल्यामुळे वाहनचालकांची कसरत होते. तर अनेक ठिकाणी पंपांच्या सहाय्याने पाणी बाहेर काढण्याचं काम सुरु झालं आहे.