मुंबईत चोवीस तासात सर्वाधिक पाऊस कुठे पडला?, कुठे कुठे उडाली दाणादाण; जाणून घ्या सर्व काही
मुंबई | 27 जुलै 2023 : मुंबईसह राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. सकाळपासून मुंबईत पावसाची रिपरिप सुरू आहे. कालच हवामाना खात्याने मुंबईत रेड अलर्ट दिला होता. मात्र, हवामान खात्याने आपला अंदाज बदलला असून रेड ऐवजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईवरील अतिवृष्टीचं संकट कोसळलं आहे. मात्र, मुंबईत मुसळधार पाऊस होणार असल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलेलं असल्याने धोका अजूनही टळलेला नाही.
गेल्या 24 तासात मुंबईतील सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे. गेल्या 24 तासात मुंबईतील कुलाबा येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. कुलाब्यात 219 मिमी पाऊस कोसळला. त्यानंतर फोर्ट परिसरात 174 मिमी, नरीमन पॉइंट येथे 171 मिमी, मरोळमध्ये 159 मिमी, अंधेरी पूर्वेला 154 मिमी आणि जोगेश्वरीत 147 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच मुंबईतील इतर अनेक भागात 100 मिमीच्यावर पावसाची नोंद झाली आहे.
चर्चगेटवर प्रचंड पाणी
चर्चगेट रेल्वे ट्रॅकवरील पाणी उपसल्याने चर्चगेट परिसर जलमय झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबलं आहे. पंप लावून पाण्याचा निचरा करण्यात येत आहे. परिसरात पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. जवळपास गुढगाभर पाणी रस्त्यावर साचले असून नागरिकांना तशाच पावसातून मार्ग काढत जावं लागत आहे. पालिका कर्मचारी पाण्याचा निचरा करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. मात्र, या पाण्याचा निचरा कधीपर्यंत होईल याची काही माहिती देण्यात आलेली नाही.
ढग दाटले
मुंबईत काल रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टीही देण्यात आली होती. आज दुपारनंतर मुंबईत अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, दुपारी हवामान खात्याने मुंबईला ऑरेंज अलर्ट असल्याचं म्हटलं. त्यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र, तरीही मुंबईत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. कारण नसताना घराबाहेर न पडण्याचं आवाहन मुंबईकरांना करण्यात आलं आहे.