मनसेच्या उपशहर अध्यक्षाला अटक बिल्डरकडून सहा लाखाची मागितले खंडणी , झाड छाटल्याने मनसे स्टाईलने कारवाईची धमकी

21
0
Share:

नवी मुंबई : सहा लाखाच्या खंडणीसाठी धमकावणाऱ्या पनवेलच्या मनसे उपशहर अध्यक्षाला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. झाडाच्या फांद्या छाटल्याने कारवाईची धकमी देऊन सहा लाखाची खंडणी मागत होता. त्यापैकी अडीच लाख रुपये घेण्यासाठी तो आला असता सापळा लावून पकडण्यात आले. मिलिंद खाडे असे पोलिसांनी अटक केलेल्या मनसे उपशहर अध्यक्षाचे नाव आहे. कामोठे येथील रहिवाशी धर्मा जोशी यांना तो एक महिन्यापासून खंडणीसाठी धमकावत होता. जोशी हे सिडकोचे निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांनी घराच्या बांधकामात आड येणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडल्या होत्या. याप्रकरणी पालिकेकडे तक्रार करून कारवाई टाळण्यासाठी मिलिंद खाडे याने जोशी यांच्याकडे सहा लाख रुपयांची मागणी होती. तसेच मनसे स्टाईल ने कारवाईची धमकी देत सोशल मीडियावर त्यांची बदनामी करत होता. त्यामुळे जोशी यांनी त्याच्याविरोधात गुन्हे शाखा उपायुक्त तुषार दोशी यांच्याकडे तक्रार केली .

त्यानंतर खंडणी विरोधी पथक त्याच्यावर पाळत ठेवून होते. यावेळी खाडे याने तडजोड करून साडेपाच लाख रुपये स्वीकारायची तयारी दाखवली. त्यापैकी अडीच लाखाचा पहिला हप्ता घेण्यासाठी तो कामोठे येथे येणार होता. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक शिरीष पवार यांच्या मागर्दर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश वाघमारे, सहायक फौजदार शेखर तायडे, सतीश भोसले, अनिल कदम, सूर्यभान जाधव, भास्कर कुंभार, राजेंद्र सोनावणे यांनी सापळा रचला होता. यावेळी त्याठिकाणी आलेल्या खाडे याने जोशी यांच्याकडून रक्कम घेऊन चलाखीने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता, सापळा रचून बसलेल्या खंडणी विरोधी पथकाने त्याला अटक केली. त्याच्याविरोधात कामोठे पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पनवेल न्यायालयाने त्याला ११ फेब्रुवारी पर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे.

Share: