मराठवाड्याची टॅंकरवाड्याच्या दिशेने वाटचाल

12
0
Share:

भूगर्भासह भूपृष्ठावरील पाणीसाठे झपाट्याने आटत चाललेल्या मराठवाड्याची वाटचाल मार्च महिन्‍यात दुसऱ्या आठवड्यातच टॅंकरवाड्याच्या दिशेने सुरू झाली आहे. आठही जिल्ह्यांतील १२४० गावे, ३९७ वाड्यांना भीषण पाणीसंकटाचा सामना करावा लागत आहे. तेथील सुमारे ३३ लाख २२ हजारांवर लोकांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. त्यासाठी प्रशासनाने १६२७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.

पावसाचे प्रदीर्घ खंड व सरासरीच्या तुलनेत साठ टक्‍केच पाउस झालेल्या मराठवाड्यात यंदा पाणीसंकट भीषण आहे. औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील ५४६ गाव २०५ वाड्यांमधील १२ लाख २९ हजार ७२६ लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने ७८० टॅंकरची सोय केली आहे. बीड जिल्ह्यात ३८५ गाव व १५३ वाड्यांमधील ७ लाख ४४ हजार ९३१ लोकांना पाणी संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्यासाठी ४७० टॅंकर सुरू आहेत. जालना जिल्ह्यातील २२४ गाव व ३१ वाड्यांमधील ११ लाख ५४ हजार ८०७ लोकांची तहान २७७ टॅंकरच्या साह्याने भागविणे सुरू आहे.

नांदेड जिल्ह्यातील ३१ गाव व ६ वाड्यांमधील ५३ हजार ९५९ लोकांची तहान २८ टॅंकरने भागविणे सुरू आहे. पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील ३६ गावांतील ९४ हजार ८१ लोकांना ४७ टॅंकर पाणी पुरवित आहेत. लातूर जिल्ह्यातील चार गावांतील ११ हजार ८२० लोकांची तहान भागविण्यासाठी ४ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील ९ गावे व २ वाड्यांमधील २३ हजार ९०९ लोकांसाठी १६ टॅंकर सुरू आहेत. परभणी जिल्ह्यातील ५ गावांतील ९४९५ लोकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून त्यासाठी ५ टॅंकर कार्यरत आहेत.

Share: