Mumbai Breaking: परदेशातून परतणाऱ्या भारतीयांसाठी मुंबईत ८८ हॉटेलमध्ये ३,३४३ कक्ष अलगीकरणासाठी आरक्षित.

4
0
Share:

*परदेशातून परतणाऱ्या भारतीयांसाठी मुंबईत ८८ हॉटेलमध्ये ३,३४३ कक्ष अलगीकरणासाठी आरक्षित*

 

मुंबई : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधसाठी जगभरात सुरू असलेल्या लॉक डाऊन कालावधीत वेगवेगळ्या देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना भारतात परत आणण्यात येणार आहे. याअंतर्गत मुंबईत विशेष विमानांनी परतणाऱ्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून प्रारंभी अलगीकरण (quarantine) केले जाणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेने एकूण ८८ हॉटेलमध्ये मिळून ३,३४३ कक्ष आरक्षित केले आहेत.

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जगभरात बहुतेक सर्व देशांनी लॉक डाऊनचा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशांमध्ये भारतीय नागरिक अडकले आहेत. या सर्व नागरिकांना हवाई आणि जलमार्गे भारतात परत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून आज (दिनांक ७ मे २०२०) पासून सुरू झालेल्या पहिल्या प्रयत्नात विविध बारा देशातून, ६४ विमान फेऱ्यांमधून एकूण १४,८०० प्रवासी भारतात येणार आहेत. पैकी मुंबईमध्ये एकूण सात विमानातून सुमारे १,९०० नागरिक येतील. बांगलादेश, फिलिपिन्स, सिंगापूर, मलेशिया, ब्रिटन आणि अमेरिका या देशांमधून हे नागरिक मुंबईत परतणार आहेत.

परतलेल्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून प्रारंभी अलगीकरण केले जाणार आहे. अलगीकरण कालावधीत तपासणी केल्यानंतर कोरोना बाधा झालेली आढळल्यास त्यांना रुग्णालयात दाखल केले जाईल. अलगीकरण करण्यासाठी मुंबईतील विविध ८८ हॉटेलमध्ये एकूण ३,३४३ कक्ष आरक्षित करण्यात आले आहेत. यामध्ये दोन/ तीन/ चार /पाच तारांकित तसेच वेगवेगळ्या हॉटेल्स सोबत अपार्टमेंट हॉटेल, ओयो बजेट हॉटेलचा देखील समावेश आहे.

Share: