Mumbai Coronavirus | चीनपेक्षा अधिक मुंबईत कोरोनाग्रस्त

8
0
Share:

 

मुंबई: आधी भारत, मग महाराष्ट्र आणि आता मुंबई. देशाच्या आर्थिक राजधानीतील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येने कोरोनाचा उगम झाला त्या चीन देशातील एकूण रुग्णसंख्येला मागे टाकले आहे. मुंबईत कालपर्यंत (6 जुलै) 85 हजार 270 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. एक महिन्यापूर्वी, म्हणजे 7 जून रोजी महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या चीनमधील बाधितांपेक्षा अधिक झाली होती.

मुंबईत एकूण 85 हजार 270 कोरोनाग्रस्त रुग्ण असून यापैकी 4 हजार 899 जणांचा मृत्यू झाला आहे. तर चीनमध्ये एकूण 83,565 रुग्ण असून 4,634 जणांचा मृत्यू झाला आहे.

चीनमध्ये सध्या 403, तर मुंबईत 23 हजार 732 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत 57 हजार 152 रुग्ण कोरोनामुक्त झाले ही दिलासादायक गोष्ट आहे. मात्र रुग्णसंख्या, मृत्यू आणि अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असा सगळ्याच बाबतीत मुंबईने जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनला मागे टाकले आहे. सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या, तर चीन मागे-मागे जात 22 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

राज्यात काल (6 जुलै) दिवसभरात 5 हजार 368 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 11 हजार 987 वर पोहोचला आहे. दिवसभरात 3 हजार 522 रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात आतापर्यंत 1 लाख 15 हजार 262 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोना रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण 54.37 टक्क्यांवर पोहोचलं आहे. राज्यात सध्या 87 हजार 681 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्रात कोरोनामुळे काल 204 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये एकट्या मुंबईतील 39 तर नवी मुंबईतील 28 रुग्णांचा समावेश होता. राज्याचा कोरोना मृत्यूदर हा 4.26 टक्के एवढा आहे.

देशात चित्र काय?

भारतात (सकाळी 9 वाजेपर्यंत) गेल्या 24 तासात 22 हजार 252 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले, तर 467 जणांना प्राण गमवावे लागले. देशात एकूण 7 लाख 19 हजार 665 कोरोनाग्रस्त आहेत. यापैकी 2 लाख 59 हजार 557 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तर 4 लाख 39 हजार 948 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत देशात 20 हजार 160 जणांचा कोरोनामुळे बळी गेला.

नुकताच भारत सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या जागतिक यादीत तिसऱ्या स्थानावर गेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब्राझीलमध्ये 16 लाख 26 हजार 071, तर सर्वोच्च स्थानी असलेल्या अमेरिकेत तब्बल 30 लाख 40 हजार 833 रुग्ण आहेत.

Share: