मोदी हे कमी खर्चात परदेश दौऱ्यावर जास्त भर देतात -अमित शाह

4
0
Share:

*नरेंद्र  मोदी परदेश दौऱ्यादरम्यान विमानतळावरच राहतात: अमित शाह*

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावर असताना विमानांच्या तांत्रिक थांब्यादरम्यान पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याऐवजी विमानतळावरच राहतात अशी माहिती गृहमंत्री आणि त्यांचे जवळचे सहकारी असणाऱ्या शाह यांनी दिली आहे. पंतप्रधान हे त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याऐवजी विमानतळावरच राहतात तेथेच अंघोळ करतात आणि पुढच्या दौऱ्याला रवाना होतात. सामान्यपणे जगभरातील वेगवेगळ्या देशातील पंतप्रधान परदेश दौऱ्यादरम्यानच्या तांत्रिक थांब्याच्या वेळी पंचतारांकित हॉटेलमध्ये राहतात. यावर होणारा खर्च टाळण्यासाठी मोदी विमातळावरच राहतात असं शाह यांनी सांगितलं आहे.

अनेकदा मोदींच्या परदेश दौऱ्यांवर होणाऱ्या खर्चावरुन टीका केली जाते याच पार्श्वभूमीवर एका प्रश्नाला उत्तर देताना शाह यांनी मोदींच्या परदेश दौऱ्यासंदर्भातील माहिती सभागृहामधील सदस्यांना दिली.
मोदी हे कमी खर्चात परदेश दौऱ्यावर जास्त भर देतात असंही शाह यांनी सांगितलं. रात्रीच्या वेळी विमानांच्या तांत्रिक थांब्यादरम्यान मोदी आणि त्यांचे सहकारी पंचतारांकित हॉटेलमध्ये न जाता विमानतळावरच थांबतात असं शाह यांनी सांगितलं आहे. “मोदी हे त्यांच्या खासगी आणि सार्वजनिक जिवनामध्ये वावरताना खूप शिस्त पाळतात. उदाहरण द्यायचे झाल्यास मोदी परदेश दौऱ्यावर स्वत:बरोबर केवळ २० टक्के कर्चमारी घेऊन जातात. त्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्याही मर्यादीत असते. आधी प्रत्येक अधिकारी वेगळी गाडी वापरायचा आता तसं होतं नाही. आता सर्वजण एका मोठ्या गाडीत किंवा बसने प्रवास करतात,” अशी माहिती शाह यांनी दिली. विशेष सुरक्षा गट (सुधारणा) कायदा २०१९ संदर्भातील प्रश्नाला शाह उत्तर देताना शाह हे बुधवारी लोकसभेमध्ये बोलत होते.

“विशेष सुरक्षा गटातील (एसपीजी) सुरक्षायंत्रणांचा गांधी कुटुंबाकडून अनेकदा गैरवापर झाला आहे. मात्र मागील २० वर्षांपासून एसपीजीची सुरक्षा असणाऱ्या मोदींनी कधीही एसपीजीच्या नियमांची पायमल्ली केलेली नाही,” असंही शाह यावेळी बोलताना म्हणाले. “काही जणांसाठी सुरक्षारक्षकांचे कडे त्यांच्या भोवती असणे हे स्टेटस सिम्बॉल समजले जाते. अनेकांनी या सुरक्षेसंदर्भातील नियम मोडल्याचे लक्षात आले आहे. मात्र आपण सर्वांनी यासंदर्भात मोदींचा आदर्श घ्यायला हवा. ते नेहमीच सुरक्षा यंत्रणांसंदर्भातील नियमांचे पालन करतात,” अशा शब्दात शाह यांनी मोदींचे कौतुक केले.

Share: