नवी मुंबई महापालिकातर्फे अनंत चतुर्दशीदिनी श्रीगणेशमूर्ती विसर्जनाचे सुव्यवस्थित नियोजन

19
0
Share:

नवी मुंबई: यावर्षीचा श्रीगणेशोत्सव कोव्हीड 19 च्या कालावधीत संपन्न होत असल्याने शासनाने जारी केलेल्या विविध मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत सर्व नागरिकांनी श्रीगणरायाचा हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी स्वयंशिस्तीचे पालन केले आणि जागरूकतेचे दर्शन घडविले.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने कोव्हीड 19 च्या प्रसाराला प्रतिबंध व्हावा याकरिता विसर्जनस्थळी होणारी गर्दी टाळण्यासाठी आठही विभागांमध्ये नागरिकांना सोयीचे ठरेल अशा 135 ठिकाणी कृत्रिम विसर्जन स्थळांची निर्मिती करण्यात आली. नागरिकांनी 22 पारंपारिक विसर्जन स्थळांपेक्षा या कृत्रिम विसर्जन स्थळांना अधिक पसंती दिल्याचे दिसून आले. दीड, पाच, गौरीसह सहा व सातव्या दिवसाच्या 4 विसर्जनदिनी 23 पारंपारिक विसर्जन स्थळांवर 8894 श्रीगणेशमूर्तींचे तसेच 135 कृ्त्रिम विसर्जन स्थळांवर 10682 श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले.
अनंत चतुर्दशीदिनी दरवर्षी मोठ्या प्रमाणात श्रीगणेशमूर्ती विसर्जन होत असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सर्वच ठिकाणी विशेष काळजी घेण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रातील 22 मुख्य विसर्जन स्थळांवर संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून स्वयंसेवक, लाईफगार्ड्स व्यवस्था अधिक कृतिशीलपणे कार्यरत असणार आहे. त्यासोबतच अग्निशमन दलाचे जवान कार्यरत असणार आहेत. पोलीस यंत्रणेचेही विसर्जन स्थळावरील कायदा व सुव्यवस्थेकडे बारकाईने लक्ष असणार आहे. सर्व मुख्य विसर्जन स्थळांवर नागरिकांच्या सुरक्षा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सी.सी.टी.व्ही. यंत्रणा लावण्यात आली असून याव्दारे बारीक लक्ष ठेवले जाणार आहे.
कृत्रिम विसर्जन स्थळांसह सर्व विसर्जनस्थळांवर विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे व पिण्याच्या पाण्यासह प्रथमोपचार वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यावर्षी शासन निर्देशानुसार कोव्हीड 19 च्या प्रसार प्रतिबंधासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने मिरवणूका काढण्यात येणार नसल्याने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दरवर्षीप्रमाणे मंच उभारून श्रीगणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावयाची आहे. संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून विसर्जनस्थळांवर व्यासपीठ उभारण्यात आले असून त्याठिकाणी ध्वनीक्षेपकाद्वारे श्रीगणेशभक्तांचे स्वागत तसेच विसर्जनाच्या दृष्टीने मौलिक सूचना देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.दरवर्षीप्रमाणेच नागरिकांच्या मिळणा-या उत्तम सहयोगामुळे यावर्षी कोव्हीड 19 च्या श्रीगणेशोत्सवातील आत्तापर्यंतचे श्रीमूर्ती विसर्जन निर्विघ्नपणे पार पडले असून अनंतचतुर्दशीदिनी होणा-या विसर्जन सोहळ्याकरिता महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांचेमार्फत सर्वोतोपरी दक्षता घेण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी गर्दी टाळून तसेच मास्कचा वापर, सुरक्षित अंतर असे आरोग्यभान ठेवून संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Share: