“देवच भारतीय अर्थव्यवस्थेला वाचवू शकतो”: पी. चिदंबरम

18
0
Share:

*देवच भारतीय अर्थव्यवस्थेला वाचवू शकतो, अशी खोचक टीका काँग्रेस नेते पी. चिदंबरम* *यांनी भाजप वर केली*

नवी भाजपचा आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम पाहता आता फक्त देवच भारतीय अर्थव्यवस्थेला वाचवू शकतो, अशी खोचक टीका काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर ४.५ टक्क्यांपर्यंत खाली आल्याची आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध झाली होती. ही गेल्या सहा वर्षांतील निचांकी कामगिरी आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी विरोधकांनी लोकसभेत सरकारला धारेवर धरले होते. त्यावेळी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत जीडीपी ही संकल्पनाच बिनकामाची असल्याचे म्हटले होते.

अर्थव्यवस्थेची स्थिती दर्शविण्यात जीडीपीचे फार महत्त्व नाही.
१९३४ पूर्वी जीडीपी ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. त्यामुळे जीडीपी म्हणजे रामायण, महाभारत किंवा बायबल आहे, असे मानण्याची गरज नाही. भविष्यात ही संकल्पना बिनकामाची ठरेल, असे दुबे यांनी सांगितले होते.

या पार्श्वभूमीवर पी. चिदंबरम यांनी मंगळवारी ट्विट करून भाजपला टोला हाणला. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सरकारच्यादृष्टीने जीडीपीचे आकडे बिनकामाचे आहेत, वैयक्तिक करात कपात होत आहे आणि आयातशुल्कात वाढ करण्यात आली आहे. हा भाजपचा आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम आहे. त्यामुळे आता देवच भारतीय अर्थव्यवस्थेला वाचवू शकतो, असे चिदंबरम यांनी म्हटले.
राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने काही दिवसांपूर्वीच जीडीपीची आकडेवारी प्रसिद्ध केली होती. या आकडेवारीनुसार जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा विकासदर ४.५ टक्क्यांपर्यंत खाली घसरल्याचे दिसून आले. भारतीय अर्थव्यवस्थेची ही गेल्या सहा वर्षांतील निच्चांकी कामगिरी आहे. यापूर्वी मार्च २०१३ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर ४.३ टक्के इतका नोंदवण्यात आला होता.

Share: