महाविकास आघाडीच्या निर्मितीमुळे पंकजा मुंडे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

18
0
Share:

महाविकास आघाडीच्या निर्मितीमुळे पंकजा मुंडे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

माजी महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदार संघातून धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध पराभावाला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांच्या विधान परिषदेची चर्चा सुरू झाली होती. मात्र राज्यातील नवीन समिकरणं उदयाला आल्यामुळे भाजपची मोठी अडचण झाली आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या निर्मितीमुळे भाजपला विधान परिषद निवडणूकही जड जाणार आहे. यामुळे पंकजा मुंडे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष एकत्र आल्यामुळे सहाजिकच या पक्षांची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
त्याचा परिणाम विधान परिषदेच्या जागांवरही होणार आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल नियुक्त आणि विधानसभेवर निवडून येणाऱ्या सदस्यांची मते कमी होणार आहेत. तर स्थानिक स्वराज्य संस्थेतही भाजपला मोठा धक्का बसणार आहे.

2020 मध्ये राज्यपाल नियुक्त 12, आमदारांद्वारे निवडल्या जाणारी 9 आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडलेल्या 5 सदस्यांचा असा एकून 26 सदस्यांचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. शिवसेना-भाजप युती असती तर 26 पैकी किमान 13 जागा भाजपला मिळाल्या असत्या. आता मात्र या जागा मिळवण्यासाठी भाजपला मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

परळी मतदार संघातील पराभवानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर पाठविण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र महाविकास आघाडीच्या वाढलेल्या प्राबल्यामुळे पंकजा यांचा विधान परिषदेचा मार्ग खडतर होणार हेही तेवढंच खरं आहे.

Share: