Parle G कंपनीतर्फे पुढच्या तीन आठवड्यात 3 कोटी बिस्कीट वाटणार

5
0
Share:

मुंबई:कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. या घोषनेनंतर हातावरती पोट असणारे अनेक मजूर चिंताग्रस्त झाले आहेत. घराबाहेर पडलं नाही तर पोट कसं भरणार? असा प्रश्न अनेक मजूर आणि रस्त्यांवर राहणाऱ्यांना पडत आहे. मात्र, या लोकांसाठी पार्ले कंपनी (Parle G Company) धावून आली आहे. पार्ले कंपनी पुढच्या 3 आठवड्यात 3 कोटी बिस्किट पुड्यांची वाटप करणार आहे (Parle G Company).

लॉकडाऊन दरम्यान रस्त्यांवर राहणारे किंवा हातावरती पोट असणारे नागरिक यांच्यापर्यंत अन्न पोहचावं या उद्देशाने पार्ले कंपनीने ही घोषणा केली. पार्ले कंपनी प्रत्येकी एक आठवड्यात 1 कोटी बिस्किट पुड्यांची वाटप करणार आहे. देशात पुढचे 3 आठवडे लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनपर्यंत पार्ले कंपनी गरिबांसाठी बिस्किट पुड्यांची वाटप करणार आहे. पार्ले कंपनीने याअगोदरही अनेकवेळा परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.

देशावर कोरोना आजाराचं मोठं संकट आलं आहे. कोरोनाने जगभरात थैमान घातलं आहे. आता हा आजार भारतातही वाढू लागला आहे. मात्र, या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार सर्वोत्तोपरी मेहनत घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनची घोषणा झाली. देशातील नागरिक या लॉकडाऊनला सकारात्मक प्रतिसादही देत आहेत. त्यानंतर अनेक कंपन्यांही परिस्थितीचं गांभीर्य जाणून मदतीचा हात पुढे करत आहेत.

80 कोटी लोकांना 2 रुपयात गहू आणि 3 रुपयात तांदूळ मिळणार

दरम्यान, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज आणखी एक मोठी घोषणा केली. घरातून बाहेर न पडल्यास घरात पैसे कसे येणार आणि पोट कसं भरणार? असा प्रश्न उपस्थित होणाऱ्या गरिब, होतकरु कुटुंबांना सरकारने दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने देशातील 80 कोटी नागरिकांना दर महिन्याला प्रती व्यक्ती 27 किलो रुपयांचे गहू अवघ्या 2 रुपयांना आणि प्रती किलो 34 रुपये किंमतीचे असणारे तांदूळ फक्त 3 रुपयांत देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात अंबानींचंदेखील दिलदार पाऊल

कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील कंपन्या ठप्प झाल्या आहेत.अशावेळी अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. रिलायन्सने देखील अशाचप्रकारे आपल्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना संसर्गाच्या काळात आपल्या कर्मचाऱ्यांवर कोणताही आर्थिक ताण येऊ नये म्हणून रिलायन्सने मासिक वेतन 30 हजार रुपयांहून कमी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुढील काळात दुप्पट वेतन देण्याची घोषणा केली आहे.

Share: