गुजरातमधील अतिवृष्टीमुळे शेंगदाण्याचा आवक घटली; दर तेजीत

22
0
Share:

वाशी (एपीएमसी) :गुजरातमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथून होणारी शेंगदाण्याची आवक जवळपास थांबल्याने ऐन नवरात्रोत्सवात त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी त्याचे दर तेजीत आहेत.

नवरात्रोत्सवातील उपवासामुळे दरवर्षी या काळात शेंगदाणा, भगर तसेच साबुदाण्याच्या मागणीत वाढ होते. येथील वाशी एपीएमसी मार्केटतुन मुंबई व उपनगरात   किरकोळ बाजारात उपवासाचे खाद्यपदार्थ विक्रीसाठी पाठविले जातात. गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे तेथून होणारी शेंगदाण्याची आवक जवळपास थांबली आहे. बाजारात नवीन हंगामातील शेंगदाण्याची आवक नवरात्रीपूर्वी होणे अपेक्षित होते. मात्र बाजारात शेंगदाण्याची आवक होत नसल्याने तुटवडा निर्माण झाला आहे, अशी माहिती  एपीएमसी मार्केटचे  साबुदाणा, शेंगदाण्याचे घाऊक व्यापारी सुरेश भानुशाली  यांनी ‘एपीएमसी न्युज’शी बोलताना दिली. बाजारात सध्या मागणीच्या तुलनेत शेंगदाण्याची आवक अपुरी आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या शेंगदाण्याची विक्री सुरू आहे. या शेंगदाण्याची प्रतवारीही तितकीशी चांगली नाही. अगदी हलक्या प्रतीच्या शेंगदाण्याची प्रतिकिलोची विक्री घाऊक बाजारात १०० ते १४० रुपये दराने केली जात आहे. बाजारात सध्या तमिळनाडूतील सेलम जिल्ह्य़ातून साबुदाण्याची तसेच नाशिक जिल्ह्य़ातून भगरीची आवक सुरू झाली आहे.

घाऊक बाजारात सध्या नाशिकमधून भगरीच्या सहा हजार पोत्यांची रोज आवक होत आहे. शेंगदाण्याला मागणी चांगली असली तरी दररोज होणारी आवक अतिशय कमी आहे.

तयार पिठांना मागणी

उत्तर भारतातून शिंगाडा आणि कुट्टूची आवक वाढली आहे. उपवासाची दशमी, पुरी, भाजणी, थालीपीठ तयार करण्यासाठी भगर पीठ, राजगिरा, साबुदाणा, कुट्टूपासून तयार करण्यात आलेल्या पिठाला मोठी मागणी असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. उपवासाच्या तयार पिठाचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे- राजगिरा पीठ- १८० रुपये, साबुदाणा पीठ- १४० रुपये, भगर पीठ- १४० ते १६० रुपये, शिंगाडा पीठ- ४०० रुपये.

किरकोळ बाजारात प्रतिकिलोचे दर

’शेंगदाणा- १२० ते १६० रुपये

’भगर- ७५ ते ८५ रुपये, ९५ ते १०० रुपये (प्रतवारीनुसार)

’साबुदाणा- ६६ ते ७५ रुपये

Share: