पेरूचे प्रक्रियायुक्त पदार्थ

Share:

भारतात उत्पादित होणाऱ्या फळ पिकांपैकी पेरू एक महत्त्वाचे फळ असून महाराष्ट्र हे राज्य सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य आहे. त्या खालोखाल मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या राज्यांचा समावेश होतो. महाराष्ट्रात पुणे, सातारा, अहमदनगर, धुळे,जळगाव, औरंगाबाद, नंदुरबार, नाशिक, अकोला, अमरावती या भागात पेरूची लागवड केली जाते.

फळाची विभागणी रंगानुसार लाल आणि पांढरा पेरू अशी केली जाते. व्यापार व प्रक्रिया करण्याच्या उद्दशाने मुख्यता सरदार (लखनौ 49) सफेद अलाहाबादी, बीड-5, नागपूर या जातीची लागवड केली जाते. भारतातील पेरू लागवडीखालील 2015-2016 सालचे एकूण क्षेत्र 254 हजार हेक्टर असून त्याचे उत्पादन 4,046 हजार टन आहे. महाराष्ट्रात हंगामामध्ये पेरूचे फळ सर्वत्र उपलब्ध असते. या फळाला चांगली मागणी असते.

पेरू हे नाशवंत फळ आहे. पेरू जास्त दिवस टिकत नाही. फळांची विक्री न झाल्यास हे फळ खराब होते व त्याचे नुकसान होते. यावर उपाय म्हणून सध्या पेरूच्या फळा व्यतिरिक्त पेरुपासून बनवलेल्या विविध पदार्थांना बाजारात चांगली मागणी आहे. या पार्श्वभूमीवर पेरू उत्पादकांसाठी पेरू प्रक्रिया उद्योग सुरु करण्याची चांगली संधी आहे. पेरुपासून टॉफी, जॅम, जेली, गर, सरबत, चीज, नेक्टर, स्क्वॅश या विविध प्रक्रियायुक्त पदार्थातून निश्चितच जास्त नफा मिळविता येऊ शकतो.

पेरूला गरीब माणसांचे सफरचंद असे हि समजले जाते. पेरू फळामध्ये ‘क’ जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते. या फळात आवळ्याच्या खालोखाल व लिंबापेक्षा हि जवळपास 4 पट जास्त ‘क’ जीवनसत्व आढळते. त्यामुळे हिरड्या बळकट होण्यास मदत होते. पेरूमुळे चांगली भूक लागते. जेवणानंतर पेरू खाल्याने पचन सुलभ होते.

पेरू फळातील कॅल्शियममुळे दात व हाडे मजबूत होतात. पेरू फळामध्ये सायट्रिक एसिड चे प्रमाण मुबलक असते. पेरू फळामध्ये प्रति 100 ग्रॅममध्ये पाणी 81.77%, कार्बोदके 11.23% प्रथिने 0.9%, तंतुमय पदार्थ 5.5%, खनिजे 0.7% ‘क’ जीवनसत्व 213 मिलीग्रॅम, कॅल्शियम 60 मिलीग्रॅम, फॉस्परस 29 मिलीग्रॅम.

Share: