लिंबाच्या निरोगी आणि सदृढ रोप निर्मितीचे तंत्र

50
0
Share:

भारतामध्ये आंबा, केळीच्या नंतर लिंबुवर्गीय फळांच्या उत्पादनाचा तिसरा क्रमांक लागतो. देशातील या फळपिकांखालील क्षेत्र 0.483 मिलीयन हेक्टर असून 4.251 मिलीयन टन एवढे वार्षिक उत्पन्न आहे. लिंबूवर्गीय उत्पादनात जगात भारताचा सहावा क्रमांक लागत असून 4.8% वाटा भारताचा आहे. या फळपिकांखालील क्षेत्रात वार्षिक 9.3% या दराने वाढत असले तरी उत्पादनात मात्र त्याप्रमाणात वाढ झालेली नाही. प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत भारताचे लिंबूवर्गीय उत्पादन फारच कमी म्हणजे ते फक्त 8.8 टन/हे. आहे. तेच प्रगत राष्ट्रात 25 ते 30 टन/हे. आहे.

विदर्भात लिंबूवर्गीय फलोत्पादनाचे क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात असून दरवर्षी 80 लक्षाहून जास्त रोपे येथील 325-350 शासकीय व खाजगी रोपवाटीकेत तयार करून विकली जातात. रोपवाटिकेचे चांगले व्यवस्थापन हे स्वस्थ व उत्पादनक्षम लिंबूवर्गीय फलोउद्योगासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सातत्याने उत्तम फळाचे भरघोस उत्पादन देणाऱ्या वाणाचे जेवढे महत्त्व आहे. तेवढेच मातृवृक्षाला कीड व रोगापासून सुरक्षित ठेवणेही महत्त्वाचे आहे. विषाणूग्रस्त रोगट मातृवृक्षामुळे रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होईल. त्याचप्रमाणे फायटोपथोरा नामक बुरशीला सहज बळी पडणारा खुंट जर वापरला तर बुडकुज, मुळकुज, डिंक्या इत्यादी रोगांची लागण तर होईलच शिवाय झाडाची वाढ सुद्धा मंदावेल, कालांतराने ऐन उमेदीच्या काळात बागेचा ऱ्हास होईल. यामुळेच अधिकांश झाडे मरतील, पाने पोखरणारी अळी ही अत्यंत नुकसानदायक कीड असून लहान रोपट्यांवर या किडीचा प्रदुर्भाव अधिक गंभीर होतो. झाडाची वाढ एकदम खुंटते. त्यासाठी या किडीवर लक्ष ठेवून वेळच्यावेळी योग्य किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करून किडीस आटोक्यात ठेवले पाहिजे.

राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळसंशोधन केंद्र, नागपूर येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित केलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर रोपवाटिका व्यवस्थापनेसाठी करून लिंबाची रोगविरहित रोपे तयार करण्याचे लक्ष्य निर्दीष्ठीत असा हा एकमेव कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. अल्प उत्पादनात, बागाच्या उत्पादनक्षम आयुर्मयादित लक्षणीय घट व शेवटी बागांच्या ऱ्हास होणे इत्यादीस एकमेव कारण म्हणजे रोगविरहीत सुदृढ रोपे उपलब्ध न होणे हे होय. या प्रकल्पाअंतर्गत बुरशी व विषाणुयुक्त रोगांपासून मुक्त अशी तयार केलेली ही रोपटी शासकीय व खाजगी पन्हेरीत मातृवृक्ष म्हणून वापरली जावीत हा हेतू आहे. यामुळे बागेच्या होणाऱ्या ऱ्हासावर मात केली जावू शकेल.

Share: