कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक जाणार बेमुदत संपावर

19
0
Share:

पुनर्वेतन निश्चिती अन्यायकारक असून, त्याची अंमलबजावणी करू नये, अशी मागणी सहयोगी प्राध्यापकांनी कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्याकडे शनिवारी केली. वेतन निश्चिती करून पैशाची वसुली झाल्यास ८ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा सहयोगी प्राध्यापकांनी दिला आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापकांना शासनाच्या १८ मार्च २०१० मधील परिपत्रकानुसार वेतन निश्चिती करण्यात आली. त्यानंतर शासनाने दोन सुधारित आदेश पारित केले त्याचा आधार घेत कृषी विद्यापीठाने नव्याने वेतन निश्चितीचे प्रयत्न चालविले आहेत. शुक्रवारी परस्पर वेतन निश्चिती करून ती पगारासाठी आवश्यक असलेल्या सेवार्थ प्रणालीवर अपलोड करण्यात येत असल्याची माहिती सहयोगी प्राध्यापकांना कळाली, असे झाल्यास तब्बल दहा ते पंधरा लाख रुपयांची वसुली प्राध्यापकांच्या पगारातून करण्यात येणार होती. त्यामुळे हादरलेल्या सहयोगी प्राध्यापक यांनी नियंत्रक कार्यालयात धाव घेतली.

या वेळी त्यांनी वेतन लेखाधिकारी जितेंद्र गावंडे यांना धारेवर धरले. परस्पर वेतन निश्चिती कशी करण्यात येत आहे, असा प्रश्नही गावंडे यांना विचारण्यात आला. सहयोगी प्राध्यापकाच्या आक्रमक शैलीमुळे घाबरलेल्या गावंडे यांनी नियंत्रक यांच्या तोंडी आदेशावरून हे केल्याची कबुली दिली. एवढ्यावरच न थांबता गावंडे यांनी तसे लेखीसुद्धा दिले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. दिलीप मानकर यांच्या उपस्थितीत गावंडे यांचा लेखी जबाब सीलबंद करण्यात आला. हा लिफाफा आज कुलगुरूंच्या सुपूर्त करण्यात आला. सहयोगी प्राध्यापकांना अंधारात ठेवत करण्यात येत असलेली कृती चुकीची आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. दोषींवर कारवाई न झाल्यास ८ मार्च पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.

Share: