माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाठ यांचा संशयास्पद मृत्यू

21
0
Share:

पुणे: भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आठ दिवसांपासून बेपत्ता असलेले माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचा मृतदेह ताम्हाणी घाटात संशयास्पदरित्या आढळला, हत्येचा कुटुंबीयांचा आरोप.
विनायक शिरसाट यांचे भाऊ किशोर शिरसाट यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती. त्यावरुन भारती विद्यापीठ पोलीस तपास करीत होते. त्यात त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन मुठा गावाच्या हद्दीत मिळून आले. त्यावरुन भारती विद्यापीठ पोलीस गेल्या दोन दिवसांपासून शोध घेत होते. सोमवारी दुपारी पिरंगुट ते लवासा या रोडवरील मुठा गावापासून काही अंतरावर असलेल्या घाटात खोल दरीत एका कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. भारती विद्यापीठ पोलीस व पौड पोलिसांनी हा मृतदेह दरीतून वर आणला. त्याच्या अंगावरील कपडे आणि खिशातील मोबाईल यावरुन त्यांचे भाऊ किशोर यांनी हा मृतदेह विनायक शिरसाट यांचा असल्याचे ओळखले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रात्री ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.

Share: