शरद पवार सहकुटुंब ‘वर्षा’वरील गणपती बाप्पाच्या दर्शनाला

8
0
Share:

शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावरील गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावरील गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. खासदार सुप्रिया सुळे यांनी दर्शनानंतरचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.
गणेशभक्त आज (अनंत चतुर्दशी) आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देणार आहेत. शरद पवार यांनी सहकुटुंब मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले.


यावेळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार, कन्या- खासदार सुप्रिया सुळे, जावई सदानंद सुळे, नात आणि इतर कुटुंबीय उपस्थित होते. तर उद्धव ठाकरे यांच्यासह पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आणि मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, वरुण सरदेसाई आदी मान्यवरही हजर होते.
मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर दरवर्षी गणरायाचे आगमन होते. मुख्यमंत्र्यांनी गणरायाची सपत्नीक पूजा करण्याची परंपरा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावरील गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली. कोरोना संकटापासून राज्याला लवकर मुक्ती मिळावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली.
दरम्यान, गेले अकरा दिवस भक्तीभावे पूजा केल्यानंतर लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. दरवर्षी अनंत चतुर्दशीला मुंबईसह राज्यभरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीचे नियोजन करण्यासाठी मुंबई महापालिकेची कसोटी लागणार आहे. गर्दीचे विभाजन व्हावे म्हणून पालिकेने 445 ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केली आहे. यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होत असल्याने गणेश मूर्तींचे विसर्जन कमी प्रमाणात केले जाण्याची शक्यता आहे.

Share: