शेतीपूरक व्यवसाय करणे गरजेचे : शरद पवार

5
0
Share:

अकलूज, जि. सोलापूर : विभक्त होणारी कुटुंबे, कुटुंबातील जमिनीच्या वाटपामुळे दिवसेंदिवस व्यक्तीकडे असणारे शेतीक्षेत्र कमी होत आहे. या परिस्थितीत कमी जमिनीत अधिक उत्पादन घेत शेतीपूरक व्यवसाय करणे गरजेचे आहे. शेती व्यवसायातील बदल व नवे तंत्रज्ञान याची माहिती होण्यासाठी कृषी प्रदर्शनांचे महत्त्व मोलाचे आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. १) येथे व्यक्त केले.

यशवंतनगर (ता. माळशिरस) येथील महाशिवरात्र यात्रा महोत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित केलेल्या शिवरत्न कृषी व औद्योगिक प्रदर्शनाचे उद्‌घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, कार्याध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील, आमदार बबनराव शिंदे, आमदार भारत भालके, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, खासगी साखर कारखान्याच्या देशपातळीवरील संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार, माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, कल्याण काळे, शिवामृत दूध संघाचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील, जिल्हा परिषद सदस्या स्वरूपाराणी मोहिते-पाटील, अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, रश्‍मी बागल, विलासराव घुमरे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, “सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी केवळ साखर कारखाना उभारला नाही. दूध संघ आणि अन्य संस्थांची उभारणी करून त्यांनी या भागातील कृषी व्यवस्था मजबूत केली. त्यांनी उभी केलेली सहकार चळवळ मोहिते-पाटील यांनी पुढे नेली. शेतीच्या क्षेत्रात अलीकडे आमूलाग्र बदल होत आहेत. या बदलाचा स्वीकार आणि शेतीला जोडधंद्याची जोड देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.”

Share: