शिर्डी बंद:वाहन,हॉटेल, दुकान बंद,साईभक्तांची गैरसोय

3
0
Share:

अहमदनगर:साईबाबांच्‍या जन्‍मस्‍थळाच्या वादानंतर शिर्डीकरांनी शिर्डी बंदची हाक देण्यात आली . शिर्डीच्या धर्तीवर पाथरीचा साईबाबा जन्मस्थान म्हणून विकास करण्याला शिर्डीकरांचा विरोध आहे. त्यासाठीच हा बेमुदत बंद आहे. यामुळे पहाटेपासूनच साईभक्तांच्या अडचणीत वाढ झाली आहे. देशभरातून आलेल्या साईभक्तांना ऐनवेळी बंद पाळण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर साई मंदिरापर्यंत जाण्यासाठी रिक्षा आणि इतर वाहनांची कोणतीही व्यवस्था नव्हती . विशेष म्हणजे वाहनांसोबत शिर्डीतील हॉटेल्स आणि दुकानं देखील बंद असल्याने साईभक्तांची मोठी गैरसोय झाली आहे.शीर्डीत रात्री 12 वाजल्यापासून बेमुदत बंद पुकारण्यात आलाय. शनिवारी (18 जानेवारी) शिर्डीत ग्रामसभेद्वारे ग्रामस्थांनी शिर्डी बंदची घोषणा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जोपर्यंत ठोस निर्णय घेत नाहीत तोपर्यंत शिर्डी बेमुदत बंदचं आवाहन शिर्डीवासीयांनी केलं आहे. भाजप नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही याविषयावर आक्रमक पवित्रा घेतला. मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचं विधान तात्काळ मागे घ्यावं, अशी मागणी राधाकृष्ण विखेंनी केली.

शिर्डीतील व्यापारी वर्ग देखील सर्व व्यवहार बंद ठेवणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री ठाकरे यावर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिर्डी बंदमुळे 24 तास खुली असणारी शिर्डी रात्री 12 वाजल्यानंतर बंद होण्यास सुरूवात झाली. यामुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे. तसेच भाविकांचीही गैरसोय होणार आहे.

दरम्यान, पाथरीमध्ये देखील बंद पुकारण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी पाथरी बंद मागे घेण्यात आला. रात्री उशीरा पाथरी बंद मागे घेत पाथरी येथील साई मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्याची घोषणा करण्यात आली.

Share: