शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी येणार ह्या 6 मुद्यांवर एकत्र

21
0
Share:

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी येणार ह्या 6 मुद्यांवर एकत्र

महाराष्ट्रातला सत्तेचा पेच सोडविण्यासाठीच्या प्रयत्नांचं केंद्र आता मुंबई ऐवजी दिल्ली झालंय. बुधवारी दिवसभर विविध राजकीय हालचालींनी राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली आणि नंतर सर्व नेते राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या 6 जनपथ या निवासस्थानी चर्चेसाठी एकत्र आलेत. या बैठकीला शरद पवार, अहमद पटेल, प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे यांच्यासह दोनही पक्षांचे मिळून 15 नेते उपस्थित होते. या बैठकीत शिवसनेसोबत एकत्र येण्यासाठी किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
शिवसेनेसारख्या वैचारिक विरोधकासोबत एकत्र येण्यासाठी समान कार्यक्रमाची गरज आहे. त्यामुळे इतर वादग्रस्त मुद्दे बाजूला पडतील असं काँग्रेसला वाटतंय. त्यामुळे पहिल्यांदा समान किमान कार्यक्रम तयार करण्यावर सर्वांचं एकमत झालंय.

हे आहेत 6 महत्त्वाचे मुद्दे

सुरुवातीला कोरडा आणि नंतर ओल्या दुष्काळात भरडल्या गेलेल्या शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी देणार. सातबारा कोरा करणार.
रोजगार वाढीला चालणा देण्यासाठी खास कार्यक्रम राबविणार.
अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी खास उपाययोजना करणार. अवास्तव खर्चाला कात्री लावणार.
पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना वेग देत विकासाची गती कायम राखणार.
शेतकरी, शेतमजूर आणि तळातला माणूस हा नव्या सरकारचा केंद्रबिंदू असणार.
उद्धव ठाकरे यांनी घोषणा केलेली 10 रुपयांमध्ये थाळी ही योजनाही किमान समान कार्यक्रमाचा भाग असणार आहे.
शिवसेनेची प्रतिमा आणि त्यांचे आग्रक्रमावर असलेले सर्व वादग्रस्त मुद्दे या किमान समान कार्यक्रमांमधून वगळण्यात येणार असून कुठेही जातीय आणि धार्मिक अजेंडा वर येणार नाही याचं शिवसेनेकडून आश्वासन घेण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्रिपद हे अडीच वर्ष शिवसेना तर अडीच वर्ष राष्ट्रवादीकडे राहावं असं राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटतं. शिवसेनेचा त्याला काहीही आक्षेप नाही. तर उपमुख्यमंत्रिपद हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.

सभागृहात कामकाज सुरळीत चालावं यासाठी विधानसभेच्या अध्यक्षाची जबाबदारी महत्त्वाची असते. त्यामुळे ते पद राष्ट्रवादीने मागितलं आहे. मात्र त्यावर अजुन एकमत झालेलं नाही. काँग्रेसही त्यासाठी इच्छुक आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांच्यासोबत असलेल्या इतर मित्रपक्षांनाही विश्वासात घेण्यासाठी चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांबाबतही आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे.

Share: