चर्चेची ८वी फेरीही निष्फळ,शेतीविषयक कायदे रद्द नाही तोपर्यंत घर परती नाही शेतकरी ठाम.

Share:

नवी दिल्ली : शेतीविषयक कायदे रद्द करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात निर्माण झालेला तिढा अद्याप कायम आहे. सोमवारी उभयतांमध्ये झालेल्या चर्चेची आठवी फेरी निष्फळ ठरली. आता पुन्हा ८ जानेवारी रोजी उभय पक्षांमध्ये बैठक होणार आहे. सहभोजनाकडे पाठ मागच्या वेळच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी लंगरमधून आलेल्या जेवणाचा आस्वाद मंत्रिगटाने घेतला होता. मात्र, सोमवारच्या बैठकीत उभय पक्षांनी सहभोजनाला प्राधान्य दिले नाही. जेवणाच्या सुट्टीदरम्यान शेतकरी संघटनांचे नेते लंगरमधून आलेले जेवण घेत होते, तर मंत्रिगट दुसऱ्या कोपऱ्यात चर्चेत गुंतला असल्याचे दृश्य विज्ञान भवनात होते.

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश या मंत्रिगटाने सोमवारी ४० शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी विज्ञान भवन येथे चर्चा केली. उभयतांमध्ये होणारी ही चर्चेची आठवी फेरी होती. चार तास चाललेल्या या बैठकीत केंद्राने तीनही कायदे रद्द करावेत, हा आग्रह शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी कायम ठेवला, तसेच किमान हमीभावाच्या (एमएसपी) मुद्द्यावरही चर्चा झाली. कृषी कायदे रद्द न करण्याच्या निर्णयावर मंत्रिगट ठाम राहिला. दोन्हीकडच्या सदस्यांचा समावेश असलेली एक समिती नेमून या संदर्भात सन्माननीय तोडगा काढला जावा, असा पर्याय मंत्रिगटाने सुचविला. मात्र, शेतकरी संघटनांनी तो धुडकावून लावला. चार तास चाललेली चर्चा निष्फळ ठरल्याने, आता ८ जानेवारीला पुन्हा एकदा बैठक घेण्याचे ठरले आहे.
जोपर्यंत केंद्र सरकार तीनही कायदे रद्द करत नाही, तोपर्यंत आम्ही घरी परत जाणार नाही. एमएसपीला कायद्याचे स्वरूप देण्याच्या मुद्द्यावरूनही एकमत झालेले नाही. आता ८ जानेवारीला होणाऱ्या बैठकीत एमएसपी आणि कायदे रद्द करणे या दोन मुद्द्यांवरच चर्चा होईल.

Share: