तुरीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी केंद्र सरकारची २० मार्च पर्यंत मुदतवाढ

27
0
Share:

केंद्र शासनाच्या किंमत समर्थन मूल्य योजनेंतर्गंत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात शनिवार (ता.९) पर्यंत ८६० शेतकऱ्यांची ४ हजार ६३७ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. तुरीच्या आॅनलाइन नोंदणीसाठी २० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

खुल्या बाजारातील दर हमीदराच्या जवळपास असल्यामुळे शासकीय खरेदी केंद्रावर तूर विक्रीस आणण्यासाठी शेतकरी इच्छुक नसल्याचे आजवरचे चित्र आहे. दरम्यान, या तीन जिल्ह्यांमध्ये एकूण ११ हजार २७१ शेतक-यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. नांदेड जिल्ह्यात नाफेडच्या खरेदी केंद्रांवर ७४२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. परंतु, नांदेड येथे ७ शेतकऱ्यांची १९.५९ क्विंटल आणि मूखेड येथे १३ शेतकऱ्यांची ४० क्विंटल तूर खरेदी झाली. धर्माबाद येथील विदर्भ को मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रांवर १२७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली त्यापैकी ५९ शेतकऱ्यांची २०० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. परभणी जिल्ह्यातील नाफेडच्या सहा केंद्रांवर ४ हजार ९३६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. परभणी, जिंतूर, पाथरी, पालम, पूर्णा येथील केंद्रांवर ४११ शेतकऱ्यांची २ हजार ६० क्विंटल तूर खरेदी झाली.

विदर्भ को मार्केटिंग फेडरेशनच्या मानवत आणि गंगाखेड येथील केंद्रांवर १ हजार ६४९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. मानवत येथे ४८ शेतकऱ्यांची २८९.५० क्विंटल आणि गंगाखेड येथे ३२ शेतकऱ्यांची १६० क्विंटल तूर खरेदी झाली. हिंगोली जिल्ह्यातील नाफेडच्या पाच खरेदी केंद्रांवर ३ हजार ८१७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. हिंगोली, कळमनुरी, वसमत, जवळा बाजार येथे एकूण २९० शेतकऱ्यांची १ हजार ८६८ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. तुरीच्या आॅनलाइन नोंदणीसाठी या आधी रविवार (ता.१०) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु, तूर नोंदणीसाठी आणखीन १० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून, शेतक-यांना २० मार्चपर्यंत आॅनलाइन नोंदणी करता येईल.

Share: