अवकाळीचा पुन्हा धुडगुस; राज्यात हिवाळ्यात पावसाच्या सरी, अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता

18
0
Share:

गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्राच्या नैऋत्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तर हिंद महासागरात चक्रवाताची बनलेली स्थिती कायम आहे.

-त्यामुळे हवेतील बाष्प खेचले गेल्याने ढगाळ हवामान झाले आहे.

मुंबई : ऐन हिवाळ्यात राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली आहे. थंडीच्या महिन्यात आलेल्या पावसामुळे अनेकांना स्वेटरऐवजी छत्री घेऊन बाहेर पडण्याची वेळ आली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं. त्यानंतर आज दुपारपासून कल्याण, डोंबिवली, नाशिक, औरंगाबाद यासह काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला आहे. मात्र रब्बी पिकांचे यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवी मुंबई,कल्याण डोंबिवलीत रिमझिम पाऊस

कल्याण, डोबिंवली, ठाणे परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. संध्याकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी रिमझिम पाऊसानेही हजेरी  लावली.

नाशिकमध्ये द्राक्षांच्या बागा उद्धवस्त होण्याची भिती

येवला तालुक्यातील पूर्व भागातील गावांमध्ये संध्याकाळी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. या पावसाने काढणीला आलेले पिकांचे मोठे नुकसान होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पाऊस सुरु झाल्याने काढलेले शेतीपीक झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. जोरदार पाऊस किंवा गारपीट झाल्यास द्राक्ष बागा उद्धवस्त होण्याची भिती द्राक्ष उत्पादक करत आहे.

तर दुसरीकडे सिन्नरमधील मेंढी गावात शिवाश्रम सोहळ्याच्या उद्धाटनप्रसंगी पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. मात्र जोरदार पावसामुळे अनेक भाविकांच्या पदरी निराशा पडली.

औरंगाबादेत वादळी वाऱ्यासह पाऊस

औरंगाबाद जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. वैजापूर, कन्नड, सोयगाव, खंडाळा, गारज या ठिकाणी जोरदार पाऊस बरसला. अवेळी बरसलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान  होणार आहे.
वाशिममध्ये पावसामुळे हवेत गारवा

वाशिम जिल्ह्यात दुपारपासून ढगाळ वातावरण होतं. त्यानंतर संध्याकाळपासून शेलुबाजार परिसरात रिमझिम पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.

शिर्डीत साईभक्तांची धावपळ

शिर्डीत रिमझिम पावसाने हजेरी लावली. तर सर्वदूर ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. अचानक आलेल्या या पावसाने वातावरणातील गारवा वाढला आहे. तसेच पावसाच्या सरी बरसल्याने साईभक्तांची धावपळ झाली.

अवकाळी पावसाचे नेमकं कारण काय?

गेल्या दोन-तीन दिवसांपासून अरबी समुद्राच्या नैऋत्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तर हिंद महासागरात चक्रवाताची बनलेली स्थिती कायम आहे. त्यामुळे हवेतील बाष्प खेचले गेल्याने ढगाळ हवामान झाले आहे.

Share: