राज्याचा आज अंतरिम अर्थसंकल्प

24
0
Share:

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून (ता.२५) सुरूवात झाली. सहा दिवसाच्या अधिवेशनात आगामी एप्रिल ते जुलै २०१९ अशा चार महिन्याच्या अत्यावश्यक खर्चाला मंजुरी, महत्त्वाची विधेयके आणि राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा असे महत्त्वाचे कामकाज होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे घोडामैदान जवळ आल्याने अधिवेशनात सत्तारूढ आणि विरोधी पक्षात राजकीय डावपेच रंगण्याचीही चिन्हे असताना आणि अंतरिम अर्थसंकल्पाला मर्यादा असताना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कसब पणाला लागणार आहे.

आज (ता. २७) दुपारी दोन वाजता अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाईल. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी फडणवीस सरकारचे आणखी एक अधिवेशन होईल. साधारणत: येत्या मे महिन्याच्या शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात होणारे अधिवेशन हे युती सरकारचे शेवटचे अधिवेशन असेल. त्यावेळी नव्या घोषणांना वाव असावा म्हणून अंतरिम अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा टाळण्याकडे सरकारचा कल असण्याचीही शक्यता आहे. मात्र, लोकसभा निवडणुकाही सत्ताधारी भाजपाकरिता महत्वाच्या असल्याने जनतेला खुश करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.

Share: