ऑक्टोबरमधील पावसाने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

4
0
Share:

मुंबई: ऑक्टोबर महिना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरला. शेतीपिकांचे ३० ते १०० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. यातही जसजसे दिवस जातील तसे हे नुकसान ३० टक्क्यांहून ८० टकक्यांपर्यंत पोचणार आहे. ऐन दिवाळसणात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा महासंकट ओढवले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई आणि पीकविम्याची मागणी केली आहे.

राज्यात यंदा चांगल्या पाऊसमानाचा अंदाज व्यक्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरिपाची जोरदार तयारी केली. उधारी, कर्ज घेऊन मोठ्या प्रमाणात पीक उत्पादनासाठी गुंतवणूक केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पेरणीही झाली.

कापूस, सोयाबीन, मका आदी प्रमुख खरीप पिकांसह विविध पिके यंदा घेण्यात आली. चार वर्षांपासूनच्या दुष्काळानंतर यंदा चांगले पीक येईल, अशी अपेक्षा होती. मराठवाडा वगळता मॉन्सून कालावधीत इतर भागांत पावसाची दमदार हजेरी होती. मात्र कमी-अधिक पावसावर मराठवाड्यातही शेतकऱ्यांनी पेरणी केली होती.

सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणाने यंदा कीड-रोगांनी सर्वच पिके बाधित झाली. पिकांना वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला. एका फवारणीच्या ठिकाणी चार-चार फवारण्या घ्याव्या लागल्या, तरीही मका, कपाशी, सोयाबीनवरील विविध रोग-अळी आटोक्यात आली नाही. मोठ्या प्रमाणात उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता असतानाच सप्टेंबरपासून खरीप पिकांची काढणी सुरू झाली, ऑक्टोबरमध्ये जवळपास सर्वच खरीप काढणीच्या अवस्थेत आला, अशातच पावसाने शेतकऱ्यांची पाठ सोडली नाही.

असे झाले पिकाचे नुकसान

मका, बाजरी, ज्वारी पिकांच्या कणसात पाणी शिरून दाण्यांना कोंब
शेंगांना पाणी लागल्याने सोयाबीन, तूर, भुईमुगाचे दाणे सडले
बोंडात पाणी शिरल्याने कापूस ओला झाला, सरकीला पुन्हा कोंब फुटले
काढणीच्या अवस्थेतील लाल कांद्याचे पीक नुकसान, रांगड्याची रोपे कुजली
द्राक्षात मोठी फळगळ, अर्ली व्हराटींचे थेट नुकसान
रोग-किडी, बुरशी आदींचा पिकांवर प्रचंड प्रादुर्भाव
मूळकुज होऊन भाजीपाला, फळभाज्यांची अन्न प्रक्रिया खंडित
डाळिंब, आंबा, लिंबू, मोसंबी, संत्रा यांचा ताण मोडला
ताण अवस्थेतील बागांना पावसामुळे फळधारणेस अडचणी
वाढलेल्या आर्द्रतेमुळे अंजिराचा खट्टा बहर अडचणीत
पेरू, सीताफळात कीड-रोगांचे प्रमाण वाढले
खुल्यावरील झेंडू, शेवंती, गुलाब आदी फुलपिकांचे नुकसान

Share: