माढा मतदारसंघात पक्के जिरवाजिरवीचे राजकारण

7
0
Share:

शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीत कधी नव्हे ते गटबाजीचे ग्रहण सुटेनासे झाल्याने माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची अग्नीपरीक्षा सुरू आहे. पवारांच्या उमेदवारीने भाजपसह बऱ्याच राजकीय पक्षांनी राजकीय तळ माढयात हलवल्याने राजकीय काटामारी रंगात आली आहे. मतदारसंघातल्या पवारांच्या दौऱ्यात मोहिते पाटलांची व आमदार बबन शिंदे यांची गैरहजेरी तर बागल गटाचे शक्तीप्रदर्शन त्यामुळे प्रीती भोजनात पवारांना पहिल्याच घासाला खडा लागला आहे. भाजपच्या सुध्दा पवार विरोधाच्या जोर बैठका सुरू झाल्या आहेत.

माढा मतदारसंघाचा राजकीय दुष्काळ थोरल्या पवारांनी संपवला असला तरी माढयाचा वनवास मात्र संपलेला नाही. सिंचन अनुशेष पंढरपूर ब्रॉडगेज या सारख्या एकाही योजनेत पॉवर बाज कल्पकता न दिसल्याने माढावासीय पवारांवर प्रचंड नाराज आहे. राज्यातील सर्वांधिक चर्चेत असणाऱ्या लोकसभा मतदारसंघामध्ये माढा मतदारसंघाचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. याला कारणेही अनेक आहेत. सन 2009 च्या निवडणुकीनंतर पुलाखालून बरेच पाणी गेलं आहे. आता माढा हा मतदारसंघ कुणासाठीही तेवढा सोपा राहिला नाही. राष्ट्रवादी-कॉंग्रेसची आघाडी असू देत की भाजप-शिवसेनेची युती असू देत, सर्वांसाठीच हा मतदारसंघ म्हणजे राष्ट्रवादीसाठी सोपा म्हणता म्हणता अवघड पेपर होऊ लागला आहे.

यापुढे मी कधीही निवडणूक लढणार नाही, असे म्हणणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच या मतदारसंघातून स्वतःची उमेदवारी जाहीर केली खरी मात्र फलटण व माढा तालुक्‍यात गटबाजीचा दोन वेळा जहरी अपशकुन झाल्याने पवारांसारखा राजकीय धुरंधर अडचणीत आल्यासारखा वाटत आहे. पवारांनी मतदारसंघावर दावा सांगितल्यानंतर हा मतदारसंघ केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात चर्चेचा ठरला असून येथे होणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. या घडामोडींच्या आधी ज्यांनी या मतदारसंघातून लढण्याचा निर्धार करुन गुडग्याला बाशिंग बांधले होते, त्या सर्वांचाच भ्रमनिरास झाला नसेल तर नवलच म्हणावे लागेल. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. त्यामुळे त्यांचे समर्थक सुखावले होते. परंतु, आयत्यावेळी त्यांनी माघार घेत शरद पवार यांच्या नावाचा आग्रह धरला. हे गौडबंगाल मोहिते-पाटलांच्या समर्थकांना मात्र रूचलेलं नाही. आमचा नेता भोळा शंकर आहे. पवारांनी सांगितले अन्‌ त्यांनी लगेच होकार दिला. परंतु, हा आमच्या नेत्यासह सर्व समर्थक, चाहत्यांवर अन्याय आहे. शरद पवारांनी बारामतीतून लढावे, असा सूर मोहिते-पाटील यांच्या समर्थकांनी लावला असून तशा संतप्त प्रतिक्रिया सोशल मिडियावर उमटल्या आहेत.

दुसरीकडे प्रभाकर देशमुख हे सुध्दा आघाडीवर होते मात्र त्यांनाही आता नेते शरद पवारांसाठी काम करावे लागणार आहे. सन 2009 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वात सुरक्षित आणि खात्रीचा मतदारसंघ म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा मतदारसंघाची निवड केली होती. तेव्हा ते भरघोस मतांनी निवडून आले होते. त्या निवडणुकीदरम्यान त्यांनी मतदारांना ढीगभर आश्वासने दिली होती. पंढरपूर ब्रॉडगेज मार्ग, औद्योगिक वसाहत, उद्योगधंदे अशा कितीतरी गोष्टी करु असे त्यांनी सांगितले होते. परंतु, शरद पवार यांच्याकडून यापैकी कशाचीही पुर्तता झाली नसल्याची ओरड आता मतदार करीत आहेत. एवढेच कशाला शरद पवारांची पाटी कोरी राहिली नसल्याचा दावा छातीठोकपणे काहीजण करीत आहेत. विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर अन्याय झाल्याच्या भावनेतून त्यांचे समर्थक चिडले आहेत. या मतदारसंघात धनगर, कोळी व ओबीसी समाजाची मते अधिक आहेत. लोहार समाजाची सुध्दा 50 हजारांहून अधिक मते आहेत. या समाजातून पवारांना विरोध होत असून तशा संतप्त भावना कार्यकर्ते, मतदार उघडपणे सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त करीत आहेत. थोडक्‍यात शरद पवारांसाठी माढा हा मतदारसंघ त्यांच्या अपेक्षेएवढा सुरक्षित राहिला नाही. आमदार बबन शिंदे यांच्या अतिमहत्वाकांक्षा आणि त्यांच्या बंधूसाठी भाजपने टाकलेला राजकीय गळ हा राष्ट्रवादीच्या झोपा उडवणारा ठरला आहे.

माढा या मतदारसंघात सुमारे 85 हजार नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. सोलापूर जिल्हयातील 4 विधानसभा मतदारसंघ व सातारा जिल्हयातील 2 असे एकूण 6 विधानसभेचे मतदारसंघ येतात. या मतदारसंघात विजयसिंह मोहिते-पाटील यांना मानणारा मोठा मतदारवर्ग आहे. दुसरीकडे येथे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सुध्दा आपले चांगले बस्तान बसविले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या नावाची सुध्दा जोरदार चर्चा आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, आ. परिचारक यांच्या भूमिका महत्वाच्या ठरणार आहेत .सहकारमंत्री सुभाष्‌ देशमुख यांच्या गटातील अंतर्गत धुसफूस सर्वश्रुत आहे. भाजप तथा युतीसाठी सुध्दा हा मतदारसंघ सोपा निश्‍चितच नाही. सदाभाउ खोत हे तर निवडणुकीनंतर इकडे फिरकलेच नसल्याचे मतदार सांगत आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनेची तर येथे अजिबात डाळ शिजणार नाही. थोडक्‍यात माढा हा मतदारसंघ कुणालाच सोपा राहिला नाही. प्रस्थापितांना धक्के देण्याची सोलापूरची परंपरा आहे. आता लोकसभेच्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि कुणाची जिरणार याकडे सर्वांचेच लक्ष राहणार आहे.

Share: