साखरेच्या टेंडराना प्रतिसाद नाही

5
0
Share:

साखरेच्या विक्री मूल्यात २०० रुपयांनी वाढ केल्यानंतर अनेक साखर कारखान्यांनी साखर विक्रीचे टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परंतू ही साखर जादा दराने घ्यावी लागणार असल्याने सध्या व्यापाऱ्यांचा या टेंडरना खरेदीसाठी प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

व्यापारी कमी किमतीने घेतलेली साखर बाजारात आणण्याची शक्‍यता असल्याने पहिले काही दिवस कारखान्याच्या टेंडरना धीमा प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता साखर वर्तुळातून व्यक्त होत आहे.
अनेक दिवसांच्या कारखान्यांच्या मागणीनंतर केंद्राने चार दिवसांपूर्वी आदेश काढून साखर विक्री मूल्य २९०० वरून ३१०० रुपयांपर्यंत वाढविले. यामुळे थोडेफार सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. राज्य बॅंकेने अद्याप साखरेचे मूल्य वाढविले नसले तरी येत्या काही दिवसात जर साखर ३१०० रुपयांनी विकू लागली तर तातडीने मूल्यांकनात शंभर ते दोनशे रुपयांची वाढ होऊ शकते. याचा फायदा कारखानदारांना कर्ज मिळताना होऊ शकतो.

केंद्राच्या दरवाढीच्या घोषणेनंतर कारखान्यांनी विलंब न करता टेंडर काढण्यची प्रक्रिया सुरू केली, परंतू व्यापाऱ्यांनी हजरजवाबीपणा दाखवत खरेदी करण्यास उत्सुकता दाखविली नाही. वाढीचा निर्णय जाहीर होण्याअगोदरच्या साखरेची विक्री करूनच व्यापारी साखरेची खरेदी करतील, अशी शक्‍यता कारखाना पातळीवर आहे.

येणाऱ्या काही दिवसांत तरी साखर खरेदी-विक्रीची प्रक्रिया संथ राहील, असा अंदाज आहे. अनेक कारखान्यांनी साखर विक्रीसाठी जादाचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मंदीच्या सावटात असणारा कारखान्यांचा साखर खरेदी विक्री विभाग सध्या जागृत झाल्याचे चित्र आहे. कारखान्यांच्या अधिकाऱ्यांकडून देशभरातीाल बाजारपेठांचा अंदाज घेण्यात येत असून जिथे शक्‍य आहे तिथे विक्रीसाठी प्रयत्न करण्यत येत असल्याची माहिती कारखान्यांच्या सूत्रांनी दिली.

Share: