गोव्यात लवकरच राजकीय भूकंप होणार – शिवसेना नेते संजय राऊत

18
0
Share:

गोव्यात लवकरच राजकीय भूकंप होणार – शिवसेना नेते संजय राऊत

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या संघर्षात भाजपावर मात दिल्यानंतर शिवसेनेने आपला मोर्चा गोव्याला वळविला आहे. गोव्यात लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले आहेत.

याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, गोव्याचे उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांच्याकडे ३ आमदार आहेत, भाजपात गेलेले काँग्रेसचे आमदारही संपर्कात, मगो २ आमदार संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितले.
गोव्यात भाजपाविरोधात शिवसेनेशी आघाडी उघडणार आहे, पर्रिकरांच्या मंत्रिमंडळात असणारे विजय सरदेसाई यांची समर्थक आमदारांसह शिवसेनेशी आघाडी करणार असल्याचं त्यांनी सांगितले.
तसेच गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार शिवसेनेसोबत येणार आहेत. गोव्यात आलेलं भाजपा सरकार लोकांना आवडलं नाही. भाजपा सरकार धोक्यात येईल फक्त गोव्यातच नव्हे तर देशभरात भाजपाविरोधात आघाडी उघडण्यात येणार असल्याचंही संजय राऊतांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीत संजय राऊत यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत आम्हाला अन्य पर्याय खुले आहेत असं सांगत भाजपाला गर्भित इशारा दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आग्रही राहिली. शिवसेनेकडून संजय राऊत यांनी वारंवार भाजपावर निशाणा साधला. संजय राऊत यांची पत्रकार परिषद, सकाळचं ट्विट आणि सामना अग्रलेख या सर्व बाजूने शिवसेनेने भाजपाची कोंडी केली. भाजपा नेत्यांवर राऊतांनी आक्रमकरित्या केलेल्या टीकेने भाजपा नेतेही संतापले.

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी संजय राऊतांनी घेतली होती. संजय राऊत यांचे शरद पवारांसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून संजय राऊतांकडे पाहिले जाते. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राज्यातील सर्व घडामोडी लक्षात घेतल्या तर, यात संजय राऊत आणि शरद पवारांची भूमिका महत्वाची असल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना-राष्ट्रवादीचे आमदार फुटणार असल्याची चर्चा झाली. त्यांनतर राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार असल्याचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आला. मात्र या सर्व परिस्थितीत सुद्धा या दोन्ही नेत्यांनी आपली भूमिका कायम ठेवत सत्तेचा तिढा सोडवून दाखवले. त्यामुळे राज्यात स्थापन होत असलेल्या सत्तास्थापनेत ‘मॅन ऑफ द मॅच’ राऊत तर ‘मॅन ऑफ द सिरीज’ शरद पवार ठरले असल्याचे बोलले जात आहे. मात्र भाजपाविरोधी आघाडी बनविण्यासाठी शिवसेनेने महाराष्ट्रात केलेले प्रयत्न आणि देशात बदललेलं राजकारण आगामी काळात भाजपाला डोईजड जाणार का? हे पाहणं गरजेचे आहे.

Share: