सोने, चांदी, सोडून चोर करतायत चक्क कांद्याची चोरी;

17
0
Share:

नाशिक: सध्या राज्यात सर्वत्रच कांद्याची आवक कमी झाल्याने कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कांद्याचे भाव गगनाला भिडले असून आता चोर सोने, चांदी, पैशांची, चोरी करत नसून चक्क कांद्याची चोरी करत सुटले आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून कांदा चोरीचे प्रकार वाढत आहेत. देवळा तालुक्यातील वाजगाव येथील कांदा चोरीची घटना ताजी असतानाच तालुक्यात वाखारवाडी येथे पुन्हा कांदा चोरीची घटना समोर आली असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या बाजारात सर्वच पिकांना उत्तम बाजार भाव मिळत असल्याने शेतमाल चोरीचे प्रकार वाढत चालले आहेत. वाखारवाडी देवळा येथील शेतकरी बाजीराव देवबा निकम यांनी मोठ्या कष्टाने उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेतले होते. मात्र बाजारात कांद्याच्या दरात चढ-उतार होत असल्यामुळे व निश्चित भाव मिळत नसल्याने शेतकरी चाळीतच कांदा साठवण्यावर भर देतात.

अगदी याचप्रमाणे निकम चाळीत साठवलेल्या कांद्याला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने तो कांदा साठवून ठेवला होता. मात्र मंगळवारी रात्री काही अज्ञात चोरट्यांनी चाळीचे कुलूप व जाळी तोडून उरलेल्या कांद्यापैकी 10 ते 15 क्विंटल कांदा चोरून नेला. बुधवारी सकाळी बाजीराव निकम यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी देवळा पोलिस स्टेशनला कांदा चोरीला गेल्याची तक्रार दिली.

कांदा चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच ऐन सणासुदीच्या दिवसांत कांदा मार्केट लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच चाळीतील उर्वरित कांदा हा सडून जात आहे आणि त्यातच कांदाच्या वाढत्या चोरीमुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

अजूनही देशातील बर्‍याच भागात जोरदार पाऊस चालूच आहे. त्यामुळे कांदासुद्धा येणाऱ्या काळात सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणणार आहे. जर कांद्याचे भाव अशाच गतीने वाढत राहिले तर यंदा दिवाळीत कांद्याचे दर आणखी वाढून किरकोळ बाजारात कांद्याचे दर 100 रुपयांच्या पुढे जाऊ शकतात, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Share: