मोदींचा हात हातात घेत उद्धव ठाकरेंनी चेहरावर स्मितहास्य ठेवत

20
0
Share:

पुणे :विधानसभा निवडणुकांनंतर युतीत फूट पडल्यावर पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शाह तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चौघे एकत्र समोरासमोर आले. चौघांसाठी अवघड ठरु शकणारा हा क्षण काहीसा सहजगत्या पार पडला. पुणे विमानतळावर मोदींचा हात हातात घेत उद्धव ठाकरेंनी चेहरावर स्मितहास्य ठेवत त्यांचं स्वागत केलं.

पोलिस महासंचालक (DGs) आणि महानिरीक्षक (IGs) यांच्या वार्षिक संमेलनाला हजेरी लावण्यासाठी नरेंद्र मोदी पुण्यात आले आहेत. उद्धव ठाकरेंनी मोदींचं स्वागत केलं, तेव्हा फडणवीस आणि शाह यांच्या चेहऱ्यावरही हास्य असल्याचं फोटोंमध्ये दिसत आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारीही उपस्थित होते. राज्याचे प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांचं स्वागत केलं.

नरेंद्र मोदींच्या आगमनाआधी पुणे विमानतळावरील व्हीआयपी कक्षात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाल्याची माहिती खासदार संजय काकडे यांनी दिली. मोदींच्या स्वागतानंतर मात्र ठाकरे मुंबईला, तर फडणवीस नागपूरला रवाना झाले.

युती तुटण्याआधी आणि नंतर

शिवसेना-भाजप युतीमध्ये असताना नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘धाकटा भाऊ’ असा केला आहे. परंतु, अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदावरुन भाजपशी बिनसल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली आणि महाविकास आघाडीची स्थापना केली. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये विस्तव जाताना दिसत नाही.

युतीची फाटाफूट झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. परंतु मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आता विरोधीपक्ष नेतेपदाची कमान सांभाळणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात बोलताना एकमेकांशी सौहार्दपूर्ण नातं कायम राखण्याची ग्वाही दिली होती.

अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे शिवसेना-भाजप यांचं नातं फिस्कटल्यावर शिक्कामोर्तब झालं होतं. भाजपने शिवसेनेला एनडीएतून बाहेरचा रस्ताही दाखवला. इतकंच नाही, तर संसदेच्या दोन्ही सभागृहात शिवसेना खासदारांची विरोधीपक्षाच्या बाकांवर सोय करण्यात आली होती.

Share: