विनावापर NMMT बसेसचे बनवले ‘मोबाईल टॉयलेट’

18
0
Share:

नवी मुंबईकरांच्या सेवेत दोन ‘अप सायकल आर्ट टॉयलेट बसेस’

नवी मुंबई :स्वच्छ सर्वेक्षण 2021 ला सामोरे जाताना ‘निश्चय केला – नंबर पहिला’ असा निर्धार व्यक्त करीत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार स्वच्छताविषयक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. कचरामुक्त शहरांचे फाईव्ह स्टार मानांकन प्राप्त करणारे नवी मुंबई हे महाराष्ट्रातील एकमेव शहर असून हागणदारीमुक्त शहराचे डबल प्लस रेटींग नवी मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झालेले आहे.


त्या अनुषंगाने स्वच्छतेचाच महत्वाचा भाग असलेल्या शौचालयांकडेही विशेष लक्ष देण्यात येत आहे. शौचालयांविषयी अभिनव संकल्पना राबवित ‘थ्री आर’ मधील ‘रियूज’ अर्थात ‘टाकाऊतून टिकाऊ’ म्हणजे पुनर्वापराची संकल्पना यशस्वीपणे राबवित एन.एम.एम.टी. च्या दोन वापरात नसलेल्या बसेसचे कलात्मक रूपांतरण करून त्याचा वापर मोबाईल टॉयलेटमध्ये करण्यात आलेला आहे. अशा दोन ‘अप सायकल आर्ट टॉयलेट बसेस’ आजपासून नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहेत.या वापरात नसलेल्या दोन एन.एम.एम.टी. बसेसचे रूपांतरण करून तयार करण्यात आलेल्या मोबाईल टॉयलेटचे लोकार्पण अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त दादासाहोब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त बाबासाहेब राजळे, समाजविकास विभागाच्या उपआयुक्त क्रांती पाटील, उप मुख्य स्वच्छता अधिकारी प्रल्हाद खोसे, उपअभियंता वसंत पडघन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.या दोन्ही वापरात नसलेल्या बसेसचे मे. सारा प्लास्ट प्रा.लि. यांनी मोबाईल टॉयलेटमध्ये रूपांतरण केले असून ग्लोबल ग्रीन इनोव्हेटर्स यांनी अत्यंत आकर्षक रितीने ‘अप सायकल आर्ट टॉयलेट बस’ कलात्मक स्वरूपात साकारली आहे. या कलात्मकतेमध्ये जसपाल सिंग नोएल. बिनॉय के, निखील एम. आणि आर्टिस्ट संकल्प पाटील, सुधीर शेडगे व वैभव घाग यांचा महत्वाचा वाटा आहे.या दोन्ही विनावापर बसेसचे मोबाईल टॉयलेटमध्ये रूपांतरण करण्यात आले असून प्रत्येक बसच्या पुढील भागात महिलांकरिता व मागील भागात पुरूषांकरीता स्वच्छतागृह व्यवस्था आहे. पुरूष व महिलांसाठी प्रवेशाकरिता दोन्ही बाजूस स्वतंत्र दरवाजे आहेत. आतील भागात महिलांसाठी तीन शौचकूपांची तसेच पुरूषांसाठी 2 शौचकुपांची व्यवस्था आहे व पुरूषांच्या भागात 2 मुतारी व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. याशिवाय 2 वॉश बेसीन असून महिलांच्या व पुरूषांच्या भागात स्वतंत्र चेंजींग रूम देखील आहेत. या बसेसच्या टपावर पाण्याची टाकी बसविण्यात आलेली असून सर्व गोष्टींचा विचार करून ही मोबाईल टॉयलेट नवी मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज झालेली आहे.

Share: