कुणाच्या विरोधासाठी नाणार रद्द करणार नाही : मुख्यमंत्री

31
0
Share:

नाणार येथील प्रस्तावित ग्रीन रिफायनरीचा प्रकल्प हा कुणाचा विरोध आहे म्हणून रद्द करणार नाही. तसेच प्रकल्प रद्द करण्यासाठी आपल्यावर कुणाचाही दबाव नाही, असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्प समर्थकांच्या शिष्टमंडळाशी बोलताना केला.

नाणार प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरण विभागाच्या परवानग्या अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केल्याचे भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी सांगितले. राजापूर तालुक्यात नाणार येथे प्रस्तावित असलेल्या तीन लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या रिफायनरी प्रकल्पावरून अद्याप संभ्रमाची स्थिती आहे. भाजपने शिवसेनेशी युती करताना नाणार प्रकल्प रद्द करण्याची अट मान्य केल्याचे बोलले जाते. शिवसेनेचा प्रकल्पाला विरोध आहे तर स्थानिक भाजप नेते प्रकल्पाच्या बाजूने आहेत.
या पार्श्वभूमीवर प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी फडणवीस यांनी प्रकल्पासाठी जारी करण्यात आलेली अधिसूचना रद्द न करण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याचे जठार यांनी सांगितले. यावेळी शिष्टमंडळाने नाणार प्रकल्पामुळे कोकणातील बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले. सरकारने नाणार प्रकल्पाबाबत सद्सद्विवेकबुद्धीने विचार करावा, अशी विनंतीही शिष्टमंडळाने केली.

Share: