धक्कादायक! मुंबई APMC मध्ये कर्करोगाचा स्फोट दोन दिवसांत 75 जण पॉझिटिव्ह, 21 रुग्ण गंभीर
तंबाखूमुक्ती मोहिमेत भीषण वास्तव उघड गुटखा विक्रीवर APMC व अन्न औषध प्रशासनाचे नियंत्रणच नाही?
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क : 
मुंबई APMC मधून   एक मोठी बातमी समोर   आले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या APMC मध्ये आयोजित दोन दिवसीय मोफत तोंडाच्या कर्करोग पूर्वतपासणी शिबिरात तब्बल ७५ जण स्क्रीनिंग पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापैकी २१ संशयित रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना तातडीने पुढील उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
जागतिक तंबाखू मुक्त दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात दोन दिवसांत एकूण ३८९ जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ९८ जणांना समुपदेशन करून पुढील उपचारांसाठी संदर्भित करण्यात आले. या आकडेवारीमुळे APMC परिसरातील तंबाखू सेवनाचे भयावह वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई Apmc सचिव शरद जरे यांनी पुढाकार घेतला आहे. टाटा मेमोरिअल सेंटर आणि वर्ल्ड अग्रो केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मसाला मार्केट आणि फळ मार्केटमध्ये हे मोफत शिबिर आयोजित करण्यात आले होते. तंबाखूमुळे होणाऱ्या गंभीर आजारांविषयी जनजागृती करणे आणि तोंडाच्या कर्करोगाचे लवकर निदान करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
मात्र, एवढ्या गंभीर परिस्थितीनंतरही बाजारातील माथाडी, मापाडी, सफाई कामगार, व्यापारी आणि इतर घटकांचा प्रतिसाद अत्यल्प असल्याचे दिसून आले. बाजार आवारत   ज्या प्रमाणात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ खरेदीसाठी पानटपऱ्यांवर गर्दी दिसते, त्याच प्रमाणात कर्करोग तपासणीसाठी नागरिक पुढे आले नाहीत, ही चिंतेची बाब असल्याचे दिसून आले.
APMC परिसरातील तंबाखूजन्य पदार्थांची उघडपणे होणारी विक्री हेच या संकटामागील मोठे कारण असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. भाजीपाला आणि फळ मार्केटसह पाचही मार्केटमध्ये जवळपास १०० पेक्षा पान टपऱ्या आहेत त्यात जवळपास ८० टक्के पानटपऱ्यांमधून गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे अन्न औषध प्रशासनाकडून   कारवाई करून टपऱ्या सील केल्या जात असल्या तरी काही महिन्यांतच त्या पुन्हा सुरू होत असल्याने गुटखा विक्री करणाऱ्या टोळ्या बाजार आवारात सक्रिय असल्याचा आरोप होत आहे.
यामुळे अन्न व औषध प्रशासन तसेच APMC प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बाजार समिती प्रशासनाकडून तंबाखूमुक्तीबाबत ज्या प्रमाणात कठोर जनजागृती आणि सातत्यपूर्ण कारवाई अपेक्षित होती, ती होत नसल्याची नाराजी बाजार घटकांमधून व्यक्त होत आहे.
“गुटख्याच्या रांगा मोठ्या… पण तपासणीसाठी लोक गायब!”
शिबिरात समोर आलेल्या आकडेवारीनंतर आता APMC परिसरातील आरोग्य व्यवस्थेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हजारो कामगार आणि व्यापाऱ्यांचा रोज वावर असलेल्या या बाजारपेठेत तंबाखूविरोधी कठोर मोहिम राबवली नाही, तर पुढील काळात कर्करोगग्रस्तांचा आकडा आणखी भयावह होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.