APMC मार्केट सेस विरोधात व्यापारी आक्रमक! कोल्हापुरात राज्यव्यापी परिषद
कोल्हापुरात ४ ऑगस्टला राज्यव्यापी व्यापारी परिषद राज्यभरातील व्यापारी नेते एकाच मंचावर
कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा मार्केट सेस रद्द करण्याची मागणी व्यापाऱ्यांच्या पुढील आंदोलनाची दिशा या परिषदेत ठरणार
कोल्हापूर | प्रतिनिधी
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून आकारला जाणारा मार्केट सेस रद्द करण्याच्या मागणीसाठी व्यापारी संघटना आता आक्रमक झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि दि कोल्हापूर ग्रेन मर्चंट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, ४ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यव्यापी व्यापारी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेत राज्यभरातील व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रतिनिधी आणि विविध बाजार समित्यांतील व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. मार्केट सेस रद्द करण्यासाठी पुढील आंदोलनाची दिशा, कायदेशीर लढाई आणि राज्य सरकारसमोर मांडण्यात येणाऱ्या मागण्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
परिषदेला चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेडचे चेअरमन मोहन गुरनानी, प्रेसिडेंट दीपेन आगरवाल, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे चेअरमन जितेंद्र शाह, दि पुणा मर्चंट चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र वाठिया तसेच ग्रेन, राईस आणि ऑईल सीड्स मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष भिमजी भानुशाली यांच्यासह राज्यातील अनेक व्यापारी नेते उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय सांगली, बारामती, लातूर, सोलापूर, जालना, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे आदी भागांतील व्यापारी संघटनांचे पदाधिकारीही परिषदेत सहभागी होणार असल्याने या बैठकीकडे राज्यभरातील व्यापारी वर्गाचे लक्ष लागले आहे.
परिषदेचे ठिकाण व वेळ
* स्थळ: नाते लॉन, महावीर गार्डन शेजारी, शाहूपुरी, कोल्हापूर
* दिनांक: ४ ऑगस्ट २०२६ (मंगळवार)
* वेळ: सकाळी १०.०० ते दुपारी २.००
मार्केट सेसच्या मुद्द्यावर व्यापारी आता एकवटत आहेत… कोल्हापुरातील ही राज्यव्यापी परिषद सरकारवर दबाव वाढवणार का? आणि या बैठकीतून आंदोलनाची नवी दिशा ठरणार का? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.