बाजार समित्या आता रोजगारनिर्मितीची केंद्रे!शेतमालाच्या खरेदी-विक्रीपलीकडे उद्योग, व्यापार अन् निर्यातीला चालना, रावलांचा मास्टरप्लॅन
-शेतकऱ्यांच्या मुलांनी नोकरी शोधू नये, रोजगारदाता बनावे!बाजार समित्यांना उद्योग, व्यापार आणि रोजगारनिर्मितीची दिशा
-२०० बाजार समित्यांतून रोजगारनिर्मितीचा महामार्ग!पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक
-कृषीमालाला देश-विदेशातील बाजारपेठ मिळणार! साठवणूक, लॉजिस्टिक्स, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि निर्यातीवर भर
-महाराष्ट्रात जागतिक दर्जाचे ‘फूड हब’ उभारणार! बंदराजवळ १,४०० एकर क्षेत्राचे नियोजन कृषीमालाला जागतिक बाजारपेठेची तयारी
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क: राज्यातील 
कृषी उत्पन्न बाजार समित्यांची भूमिका केवळ शेतमालाच्या खरेदी-विक्रीपुरती मर्यादित न ठेवता त्या रोजगारनिर्मिती, व्यापारवृद्धी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या केंद्रांमध्ये विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पणन मंत्री तथा राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचे अध्यक्ष जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामकाजाचा आणि रोजगारनिर्मितीच्या संधींचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
राज्यातील सुमारे २०० कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या माध्यमातून रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात, यावर बैठकीत भर देण्यात आला. शेतकऱ्यांच्या मुलांनी केवळ रोजगाराच्या शोधात न राहता रोजगार देणारे उद्योजक बनावे, यासाठी बाजार समित्यांनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
कृषीपूरक उद्योगांना चालना
कृषी प्रक्रिया उद्योग, साठवणूक, वाहतूक, लॉजिस्टिक्स, पॅकेजिंग, ट्रेडिंग, ब्रँडिंग, विपणन आणि निर्यात अशा विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे बाजार समित्यांनी युवकांना कौशल्य, व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.
‘बाजार समिती म्हणजे केवळ शेतमाल विक्रीची जागा नव्हे, तर रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देणारे महत्त्वाचे केंद्र असले पाहिजे,’ या दिशेने बाजार समित्यांच्या भविष्यातील विकासाचे नियोजन करण्यावर बैठकीत चर्चा झाली.
महाराष्ट्राचा कृषीमाल थेट जागतिक बाजारपेठेत
महाराष्ट्रातील शेतमाल कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, ईशान्य भारतापासून देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आणि पुढे जगातील प्रमुख बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्यासाठी सक्षम व्यवस्था उभारण्याची गरज बैठकीत अधोरेखित करण्यात आली.
दापचरी बाजाराला वाढवण डीपवॉटर पोर्टसह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहरलाल नेहरू बंदर, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे संपर्क आणि प्रस्तावित बुलेट ट्रेनची जोड मिळणार आहे. या लॉजिस्टिक जाळ्यामुळे फळे, भाजीपाला, फुले, धान्य, कडधान्ये, मसाले तसेच प्रक्रिया केलेल्या कृषी उत्पादनांची निर्यात अधिक वेगवान व किफायतशीर होण्यास मदत होईल, असा विश्वास रावल यांनी व्यक्त केला.
यासाठी साठवणूक, वाहतूक, पॅकेजिंग आणि ब्रँडिंगची सक्षम परिसंस्था उभारण्यावर भर देण्यात आला. कृषीमालाचे मूल्यवर्धन करून त्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने बाजार समित्यांनी काम करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
बंदराजवळ १,४०० एकरवर ‘फूड हब’चे नियोजन
बंदराजवळ सुमारे १,४०० एकर क्षेत्रावर जागतिक दर्जाचे ‘फूड हब’ उभारण्याचे नियोजन असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या माध्यमातून कृषीमालाची साठवणूक, प्रक्रिया, पॅकेजिंग आणि निर्यातीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जाणार आहे.यामुळे महाराष्ट्रातील कृषीमालाला देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
२०० बाजार समित्यांसमोर नवी जबाबदारी
राज्यातील सुमारे २०० बाजार समित्यांनी केवळ शेतमालाच्या व्यवहारापुरते मर्यादित न राहता कृषीपूरक उद्योग, युवकांसाठी रोजगार आणि स्थानिक व्यापाराला चालना देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा संदेश या बैठकीतून देण्यात आला.
बैठकीला कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार ठाकूर, COSAMB चे कार्यकारी संचालक जे. एस. यादव, पणन संचालक तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक व मॅनेट प्रकल्प संचालक विनायक कोकरे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि विविध बाजार समित्यांचे सभापती उपस्थित होते.
दापचरी बाजाराला वाढवण डीपवॉटर पोर्टसह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहरलाल नेहरू बंदर, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे संपर्क आणि प्रस्तावित बुलेट ट्रेनची जोड मिळणार आहे. या लॉजिस्टिक जाळ्यामुळे फळे, भाजीपाला, फुले, धान्य, कडधान्ये, मसाले तसेच प्रक्रिया केलेल्या कृषी उत्पादनांची निर्यात अधिक वेगवान व किफायतशीर होण्यास मदत होईल, असा विश्वास रावल यांनी व्यक्त केला.