राष्ट्रीय बाजार मुंबई APMC फळ मार्केटमध्ये केळीचा ‘खेळ’!
६० टनांचा कथित विना परवाना व्यापार रसायनमिश्रित पाण्यात केळी पिकविल्याचा आरोप, APMC-FDA तपासणीची मागणी
केळीचा व्यापार, महसूल आणि कृत्रिम पिकवणूक फळ बाजारातील कारभारावर प्रश्नचिन्ह
नवी मुंबई : राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजार मुंबई APMCच्या फळ बाजारात केळीच्या कथित विना परवाना व्यापाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बाजार आवारात जवळपास १०० व्यापारी बिना परवाना दररोज सुमारे ६० टन केळीचा व्यवहार होत असल्याचा दावा केला जात आहे. यातील काही व्यापारी अधिकृत परवानगी नसतानाही घाऊक व्यापार करीत असल्याचा आरोप बाजार घटकांकडून करण्यात आला आहे. या व्यवहारातून APMCला मिळणाऱ्या सेसच्या महसुलावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यातच हिरवी केळी रसायनमिश्रित पाण्यात भिजवून काही तासांत कृत्रिमरीत्या पिकविली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सकाळी हिरवी असलेली केळी संध्याकाळपर्यंत पिवळी होत असल्याने या संपूर्ण प्रकाराची APMC तसेच अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
वाशी फळ बाजारात स्वतंत्र केळी बाजारच नाही?
वाशी फळ बाजारात सध्या स्वतंत्र केळी बाजार सुरू नसल्याचे बाजार घटकांकडून सांगण्यात येत आहे. केळीचा व्यवसाय वखारीच्या माध्यमातून करण्याचे नियोजन असून, नैसर्गिक पद्धतीने केळी पिकवण्यासाठी स्वतंत्र बाजार विकसित करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, संबंधित वखारींचे काम अद्याप सुरू झालेले नसल्याने केळीच्या व्यापाराबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
काही गाळ्यांमध्ये हिरवी केळी रसायनमिश्रित पाण्यात?
काही गाळ्यांमध्ये हिरवी केळी रसायनमिश्रित पाण्यात ठेवली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही तासांतच हिरव्या केळ्यांचा रंग बदलून ती पिवळी होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अशा पद्धतीने पिकविलेली केळी बाहेरून पिवळी दिसत असली तरी ती आतून पूर्णपणे पिकली आहेत का, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
या प्रकाराची सत्यता तपासण्यासाठी संबंधित केळींचे नमुने घेऊन वैज्ञानिक पद्धतीने तपासणी करण्याची मागणी बाजार घटकांकडून करण्यात आली आहे.
४० ते ५० रुपये डझन दराने केळी
सध्या   फळ बाजारात केळीला चांगली मागणी असून, केळीचा दर साधारण ४० ते ५० रुपये डझन विक्री होत आहे . त्यामुळे मोठ्या प्रमाणावर केळीची आवक आणि विक्री होत असताना व्यापाराची अधिकृत नोंद, परवाना आणि पिकविण्याची प्रक्रिया यावर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.
६० टनांचा व्यवहार APMCच्या महसुलाचा प्रश्न
बाजार आवारात दररोज सुमारे ६० टन केळीचा व्यवहार होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, यातील काही व्यापारी परवान्याशिवाय घाऊक व्यापार करीत असल्याचा आरोप असल्याने या व्यवहाराची अधिकृत नोंद होते का आणि APMCला त्यातून किती सेस मिळतो, असा सवाल बाजारातील प्रामाणिक व्यापाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
सर्व केळी व्यापाऱ्यांचे परवाने, गेटपास, आवक-जावक नोंदी आणि प्रत्यक्ष व्यवहार तपासल्यास या व्यापाराचे नेमके चित्र स्पष्ट होऊ शकते, असे बाजार घटकांचे म्हणणे आहे.
केळीच्या कचऱ्याने घाणीचे साम्राज्य
केळीच्या कथित अनधिकृत व्यापाराबरोबरच बाजार परिसरातील कचरा आणि अस्वच्छतेचा प्रश्नही गंभीर असल्याची तक्रार आहे. खराब झालेली केळी, साली आणि इतर जैविक कचरा मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असून, त्याची योग्य विल्हेवाट न लागल्यास बाजार परिसरात घाण आणि दुर्गंधीचे प्रमाण वाढत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
APMC आणि FDA तपासणीची मागणी
एकीकडे विना परवाना व्यापाराचा आरोप, दुसरीकडे हिरवी केळी रसायनमिश्रित पाण्यात पिकविल्याची तक्रार आणि त्यातून निर्माण होणारा कचरा, यामुळे वाशी फळ बाजारातील केळी व्यापार चर्चेत आला आहे.
त्यामुळे APMC प्रशासनाने केळी व्यापाऱ्यांचे परवाने, गेटपास, आवक-जावक नोंदी आणि प्रत्यक्ष व्यवहाराची तपासणी करावी. त्याचबरोबर FDAने केळींचे नमुने घेऊन ती कोणत्या पद्धतीने पिकविली जात आहेत, याची प्रयोगशाळेत तपासणी करावी, अशी मागणी बाजार घटकांकडून होत आहे.
राष्ट्रीय बाजार अध्यक्ष आणि सचिवांच्या कारवाईकडे लक्ष
परवानाधारक व्यापाऱ्यांसाठी नियम आणि विना परवाना व्यापार करणाऱ्यांसाठी वेगळे निकष असतील तर बाजारातील शिस्त आणि महसूल व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा बाजार घटकांमध्ये आहे. त्यामुळे APMCचे अध्यक्ष आणि सचिव यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन चौकशी करावी आणि FDAच्या समन्वयाने आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
६० टनांचा कथित केळी व्यापार, परवान्याबाबतचे प्रश्न, APMCच्या सेसच्या महसुलावर उपस्थित झालेली शंका आणि रसायनमिश्रित पाण्यात केळी पिकविल्याचा आरोप या सर्व बाबींची अधिकृत तपासणी झाल्यानंतरच   फळ बाजारातील केळी व्यापाराचे वास्तव स्पष्ट होणार आहे.