राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजार” मुंबई APMC मसाला मार्केटमध्ये दुर्गंधीचे साम्राज्य; व्यापारी, माथाडी कामगार त्रस्त
गटारातील घाण पाणी रस्त्यावर लाखोंच्या नालेसफाई खर्चावर प्रश्नचिन्ह.
पावसाळ्यापूर्वीच्या साफसफाईच्या दाव्यांची पोलखोल व्यापारी, माथाडी आणि वाहतूकदार त्रस्त.
बैठका ,VC भरपूर, पण काम कुठे? मसाला मार्केटमधील L विंगची धक्कादायक अवस्था
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क : 
राष्ट्रीय महत्वाचे बाजार असलेल्या मुंबई APMC मसाला मार्केटमध्ये स्वच्छता आणि नालेसफाईच्या कामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मसाला मार्केटमधील अनेक विंगमध्ये पावसाळी गटार लाईनची साफसफाई अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः L विंगमध्ये गटारातून अत्यंत घाण पाणी बाहेर पडून संपूर्ण परिसरात साचल्याने दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
गटारातील घाण पाणी पॅसेज आणि रस्त्यांवर पसरत असल्याने व्यापारी, माथाडी कामगार, वाहतूकदार तसेच बाजारात येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की काही व्यापाऱ्यांनी मागील बाजूचे गाळे बंद ठेवून समोरील बाजूने व्यवहार सुरू केले असल्याचे सांगितले जाते.
दरवर्षी बाजार समितीकडून नालेसफाई आणि स्वच्छतेवर लाखो रुपये खर्च केला जातो. मात्र प्रत्यक्षात गटारातील पाणी रस्त्यावर येत असल्याने या कामांच्या दर्जावर आणि खर्चाच्या परिणामवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कामगारांच्या म्हणण्यानुसार, “पाऊस सुरू झाला की पाणी गटारातून वाहण्याऐवजी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे संपूर्ण परिसर जलमय होतो आणि काम करणे कठीण होते.”
विशेष म्हणजे APMCचे सचिव शरद जरे स्वच्छता, नालेसफाई आणि पावसाळी तयारीबाबत वारंवार बैठका व व्हिडिओ कॉन्फरन्स घेत असतात . मात्र त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
याशिवाय मसाला मार्केटमधील अनेक विंग व परिसरात आजही मातीचे ढिगारे, कचरा आणि अस्वच्छता कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्वच्छता कामे नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने होत आहेत का, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे.
राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल हेच बाजार समितीचे अध्यक्ष असताना देखील मूलभूत सुविधा आणि स्वच्छतेच्या समस्या कायम का आहेत, असा सवाल व्यापारी आणि कामगारांकडून उपस्थित केला जात आहे.
मुख्य प्रश्न
* नालेसफाईसाठी खर्च होणारे लाखो रुपये नेमके कुठे जात आहेत?
* पावसाळ्यापूर्वी गटार सफाईची कामे पूर्ण झाली का?
* वारंवार बैठका होऊनही परिस्थिती का बदलत नाही?
* मसाला मार्केटमधील इतर विंगमध्येही अशीच अवस्था आहे का?
मुंबई APMCच्या मसाला मार्केटमधील ही परिस्थिती राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराच्या प्रतिमेला धक्का देणारी असल्याची प्रतिक्रिया बाजार घटकांकडून व्यक्त केली जात आहे. प्रशासन यावर तातडीने उपाययोजना करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.