मुंबई APMC मसाला मार्केटमध्ये स्लॅब कोसळला; मोठी दुर्घटना थोडक्यात टळली!
ग्राहकांनो सावधान! मसाला मार्केटमध्ये खरेदीला येण्यापूर्वी विमा काढा
K विंग धोक्याच्या छायेत? पाचव्यांदा स्लॅब कोसळल्याचा व्यापाऱ्यांचा दावा
अनधिकृत बांधकामांचा फटका मसाला मार्केटची इमारत झाली कमकुवत?
राष्ट्रीय बाजारात सुरक्षेचा बोजवारा APMC प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
Apmc Slab Collaps:
मुंबई APMCच्या मसाला मार्केटमधून एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. मसाला मार्केटच्या K विंगमध्ये गुरुवारी दुपारी एका गाळ्यासमोरील स्लॅब अचानक कोसळल्याने खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेने बाजारातील व्यापारी आणि ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
स्थानिक व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, K विंगमध्ये यापूर्वीही किमान पाच वेळा स्लॅब कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. प्रत्येक वेळी प्रशासनाकडून केवळ कचरा हटवून तात्पुरती दुरुस्ती केली जाते, मात्र मूळ समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.
K विंगमध्ये गाळ्यांसमोरील पॅसेजवर अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. काही ठिकाणी एक ते दोन मजली बांधकामे उभारण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच मूळ नकाशात बदल करून शौचालयांच्या सांडपाण्याच्या पाइपलाइन टाकण्यात आल्या असून बाजार घटकांसाठी असलेल्या कँटीनचेही गोदामात रूपांतर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. काही प्रामाणिक व्यापाऱ्यांच्या मते, या अतिरिक्त भारामुळे आणि अनधिकृत बदलांमुळे इमारतीची रचना कमकुवत होत चालली आहे. त्यामुळे वारंवार स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत असून भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे ग्राहकानो सावधान… मसाला मार्केटमध्ये खरेदीसाठी येत असाल तर आधी स्वतःचा विमा काढून या. कारण कधी आणि कुठे स्लॅब कोसळेल याचा नेम नाही. एखाद्या दिवशी मोठी जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल व्यापाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
राष्ट्रीय बाजाराचा दर्जा मिळाल्यानंतरही सुरक्षेसारख्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत असून आता पणन मंत्री आणि   सचिव   या गंभीर प्रकरणात काय निर्णय घेतात, याकडे व्यापारी, कामगार आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.