मुंबई APMC नालेसफाई लाचप्रकरण; दोन अधिकारी ५ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत
मुंबई Apmc नालेसफाई प्रकरणात टक्केवारी’च्या खेळात अडकलेले अधिकारी ५ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क : 
मुंबई एपीएमसीच्या स्वच्छता विभागातील गाजलेल्या लाच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे घनकचरा व स्वच्छता उपसचिव डॉ. दीपक आवटे आणि प्रभारी स्वच्छता निरीक्षक समीर म्हात्रे यांना आता ५ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे.
नवी मुंबई एसीबीने मंगळवारी २० मे रोजी १ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोघांना रंगेहाथ पकडले होते. नालेसफाई आणि साफसफाईच्या कामांसाठी कंत्राटदाराना थकीत चेक देण्यासाठी १५ टक्के कमिशन ची मागणी करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
अटकेनंतर आरोपींना बेलापूर न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुरुवातीला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आणि १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
या कारवाईनंतर एपीएमसी प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील दोन्ही आरोपींच्या कार्यालयीन केबिन प्रशासनाने सील केल्याचे समजते . तसेच त्यांच्या राहत्या घरांची तपासणी करण्यात आली असून मूळ गावातील मालमत्तांचीही चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तपासात हस्तगत झालेल्या मुद्देमालाची माहिती लवकरच जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकरणात आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नालेसफाई आणि साफसफाईच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कमिशनखोरी झाल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.या कारवाईनंतर एपीएमसीमधील कंत्राटी कामांच्या व्यवहारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, “केवळ दोन अधिकाऱ्यांपुरती कारवाई न राहता संपूर्ण साखळीची चौकशी व्हावी,” अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. एसीबीच्या पुढील तपासातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.