मुंबई APMC कांदा-बटाटा, मसाला मार्केटच्या पुनर्विकासाचा निर्णय दोन महिन्यांत, मूलभूत सुविधांना प्रथम प्राधान्य-जयकुमार रावल पणन मंत्री
नवी मुंबई : राष्ट्रीय महत्त्वाच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील (APMC) अति धोकादायक कांदा-बटाटा मार्केट आणि मसाला मार्केटमधील मध्यवर्ती इमारतीच्या पुनर्विकासाचा निर्णय पुढील दोन महिन्यांत घेण्यात येणार आहे. बाजाराच्या पाहणीदरम्यान महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, नालेसफाई, स्वच्छता, अतिक्रमण आणि पॅसेजच्या छताची दुरवस्था या समस्या पणन मंत्री तथा APMC अध्यक्ष जयकुमार रावल यांच्या निदर्शनास आल्या. त्यानंतर या सर्व मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी APMC सचिवांना दिल्या.
महापालिकेने कांदा-बटाटा मार्केटला बजावलेल्या नोटिसांच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांशी चर्चा करून पुढील दोन महिन्यांत पुनर्विकासाचा मार्ग निश्चित केला जाईल, असे रावल यांनी स्पष्ट केले. जुन्या इमारतींचा प्रश्न सोडवताना केवळ तात्पुरती डागडुजी न करता पुढील २० ते ३० वर्षांची गरज लक्षात घेऊन आधुनिक इमारत उभारण्यावर भर दिला जाणार आहे.
सेवा शुल्काच्या नोटिसांवर व्यापाऱ्यांशी चर्चा
दरम्यान, व्यापाऱ्यांना पाठविण्यात आलेल्या सेवा शुल्क आणि सर्व्हिस टॅक्सच्या नोटिसांबाबतही व्यापाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे रावल यांनी सांगितले. बाजारातील सुविधा उभारण्यासाठी आणि त्या टिकवण्यासाठी आर्थिक स्रोत आवश्यक असला तरी व्यापाऱ्यांवरील आर्थिक भार आणि बाजाराचा विकास यामध्ये योग्य समतोल साधण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मूलभूत सुविधांना प्रथम प्राधान्य
पुनर्विकासासोबतच बाजारातील मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, स्वच्छ व गाळलेले पिण्याचे पाणी, स्नानगृहे, वीज, रस्ते, नालेसफाई आणि स्वच्छता यावर तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.
ठिकठिकाणी असलेली अतिक्रमणे हटविणे तसेच बाजारातील पॅसेजवरील खराब झालेल्या छतांची दुरुस्ती करण्याच्या सूचनाही रावल यांनी दिल्या. काही ठिकाणी अतिरिक्त स्वच्छतागृहे उभारण्यासोबतच त्यांच्या बांधकाम आणि देखभालीसाठी संबंधित संस्था किंवा खासगी संस्थांचा सहभाग घेण्याचा पर्यायही तपासला जाणार आहे.
निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेचा इशारा
राष्ट्रीय महत्त्वाच्या मुंबई APMCमधील निविदा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि नियमबद्ध करण्याचे निर्देशही रावल यांनी दिले. निविदेतील अटी-शर्ती बदलून किंवा नियमांना बगल देऊन आपल्या मर्जीतील ठेकेदाराला फायदा करून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकारी अथवा संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
पाचही बाजारांचा टप्प्याटप्प्याने विकास
APMCच्या पाचही बाजारांना ४० ते ५० वर्षे पूर्ण झाली असून, बदलत्या काळानुसार त्यांचा टप्प्याटप्प्याने विकास करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. काही इमारतींचा पुनर्विकास, तर काही ठिकाणी नवीन संरचना उभारण्याची आवश्यकता असल्याचे रावल यांनी सांगितले.
खासगी बाजारांच्या कामकाजाचा आणि उपलब्ध सुविधांचा आढावाही घेतला जाणार आहे. अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या टपरीधारकांना थेट हटविण्याऐवजी पर्यायी व्यवस्था देण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दोन-तीन वर्षांत आधुनिक APMC उभारण्याचे लक्ष्य
कांदा-बटाटा आणि मसाला मार्केटच्या पुनर्विकासासह APMCच्या पाचही बाजारांचा टप्प्याटप्प्याने विकास करण्यात येणार आहे. पुढील दोन-तीन वर्षांत आधुनिक सुविधा असलेली आणि जागतिक बाजारपेठेच्या स्पर्धेत टिकणारी नवी APMC उभी राहावी, असा सरकारचा प्रयत्न असल्याचा विश्वास रावल यांनी व्यक्त केला.