राष्ट्रीय बाजार मुंबई APMCत महत्वाचे फाईल घेऊन निवृत्त अधिकारी पसार!
पणन मंत्री व मुंबई APMC अध्यक्ष-सचिवांना अडचणीत आणण्याचा डाव?
महिला कर्मचाऱ्याचा विरोध झुगारला फाईलमध्ये काय दडलंय? जरे यांच्या चौकशीदरम्यान कंत्राटदाराच्या कागदपत्रांमुळे संशयाचे वादळ
नवी मुंबई : राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजार मुंबई APMCमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. बाजार समितीतून चार महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या यशवंत देशपांडे यांनी महत्त्वाच्या फाईल्स घेऊन पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. फाईल घेऊन जात असताना महिला कर्मचाऱ्याने विरोध करूनही त्यांनी फाईल सोबत नेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी एक फाईल ताब्यात घेतली. मात्र, आणखी काही महत्त्वाच्या फाईल्स त्यांच्यासोबत गेल्याची माहिती आहे.
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या प्रशासकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पणन मंत्री तसेच राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजार मुंबई APMCचे अध्यक्ष आणि सचिव यांना अडचणीत आणण्यासाठीच या फाईल्स घेऊन पसार होण्याचा प्रकार झाला का, अशी चर्चा बाजार समितीच्या वर्तुळात सुरू झाली आहे.
महिला कर्मचाऱ्याचा विरोध सचिवांना फोन
मिळालेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर रोजी यशवंत देशपांडे हे APMCच्या प्रशासकीय इमारतीत आले होते. त्यांनी बाजार समितीतील काही महत्त्वाच्या फाईल्स घेतल्या आणि त्या घेऊन बाहेर पडले. यावेळी सचिवांच्या खासगी PA असलेल्या महिला कर्मचाऱ्याने त्यांना फाईल घेऊन जाण्यास विरोध केला.
मात्र, विरोध करूनही देशपांडे फाईल घेऊन बाहेर पडल्याची माहिती आहे. यानंतर संबंधित महिला कर्मचाऱ्याने तातडीने APMCचे सचिव राजाराम धोंडकर यांना फोन करून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. सुरक्षा रक्षकांनी इमारतीच्या खाली देशपांडे यांच्याकडील एक फाईल ताब्यात घेतली, अशी माहिती आहे.
फाईल कंत्राटदाराच्या देयकांशी संबंधित
सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलेली फाईल ही फळ बाजारातील बहुउद्देशीय इमारतीच्या कंत्राटदाराशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. या फाईलमध्ये कंत्राटदाराच्या देयकांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे असल्याची माहिती आहे. मात्र, देशपांडे यांच्याकडे आणखी काही फाईल्स असल्याची आणि त्या घेऊन ते कार्यालयाबाहेर गेल्याची माहिती समोर येत असल्याने प्रशासनासमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.
एक फाईल सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतली मग आणखी कोणत्या फाईल्स बाहेर गेल्या? त्यामध्ये नेमकी कोणती कागदपत्रे होती? याची चौकशी होणे आवश्यक आहे.
चार महिन्यांपूर्वी निवृत्ती तरी फाईलचा ताबा कसा?
यशवंत देशपांडे हे सुमारे चार महिन्यांपूर्वी बाजार समितीतून सेवानिवृत्त झाल्याची माहिती आहे. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर त्यांनी APMCच्या कार्यालयात येऊन महत्त्वाच्या फाईल्स ताब्यात कशा घेतल्या, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
फाईल देण्याची परवानगी कोणी दिली? सचिवांना पूर्वकल्पना का देण्यात आली नाही? फाईल घेऊन जाण्याचे आदेश कोणी दिले? आणखी किती कागदपत्रे कार्यालयाबाहेर गेली? या प्रश्नांची उत्तरे आता चौकशीतून समोर येणे अपेक्षित आहे.
जरे यांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर फाईल प्रकरण
विशेष म्हणजे, सध्या मुंबई APMCमध्ये तत्कालीन पणन संचालक आणि तत्कालीन सचिव शरद जरे यांच्या कार्यकाळातील निर्णयांची चौकशी सुरू आहे. विविध प्रशासकीय निर्णय, कंत्राटे आणि देयकांशी संबंधित कागदपत्रे या चौकशीच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत.
त्यामुळे अशा संवेदनशील काळात कंत्राटदाराच्या देयकांशी संबंधित फाईल बाहेर नेऊन पसार होण्याचा प्रकार समोर आल्याने या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
जुन्या ‘बी टीम’च्या आरोपांची पुन्हा चर्चा
फळ बाजारातील बहुउद्देशीय इमारतीच्या बांधकाम आणि कंत्राटदाराच्या देयकांशी संबंधित विषय यापूर्वीही वादात राहिला आहे. तत्कालीन प्रशासनाच्या काळात सेवानिवृत्त लघुलेखक यशवंत देशपांडे यांना उपाध्यक्षांच्या कॅबिनमध्ये बसवून संबंधित कागदपत्रांचे कामकाज केले जात असल्याचे आरोप करण्यात आले होते.
या माध्यमातून कथित ‘बी टीम’च्या स्वरूपात स्वतंत्रपणे प्रशासकीय कामकाज सुरू असल्याचा आरोपही यापूर्वी करण्यात आला होता. या प्रकारावर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पणन मंत्र्यांनी हस्तक्षेप करून हे कामकाज बंद केल्याचे सांगण्यात येते.
आता चार महिन्यांपूर्वी निवृत्त झालेला अधिकारी पुन्हा APMCच्या प्रशासकीय इमारतीत येतो आणि कंत्राटदाराशी संबंधित महत्त्वाची फाईल घेऊन पसार होतो, यामुळे या जुन्या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
अध्यक्ष-सचिवांना अडचणीत आणण्याचा डाव?
सध्या बाजार समितीत प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचे बदल आणि चौकशी सुरू असताना हा प्रकार घडल्याने पणन मंत्री, APMCचे अध्यक्ष आणि सचिव यांना अडचणीत आणण्यासाठी फाईल घेऊन पसार होण्याचा प्रकार करण्यात आला का? अशी चर्चा बाजार समितीच्या वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे या प्रकारामागील नेमके कारण काय, हे अधिकृत चौकशीतूनच स्पष्ट होणार आहे.
सचिव राजाराम धोंडकर यांची भूमिका
या संपूर्ण प्रकरणाबाबत मुंबई APMCचे सचिव राजाराम धोंडकर यांनी सांगितले की, “सदर प्रकरणाची चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यात येईल.”
फाईल नेमकी कोणाच्या परवानगीने बाहेर गेली? आणखी कोणती कागदपत्रे सोबत नेण्यात आली? कंत्राटदाराच्या देयकांशी संबंधित फाईलच का नेण्यात आली?
आणि या संपूर्ण प्रकारामागे नेमका उद्देश काय?
राष्ट्रीय महत्वाचे बाजार मुंबई Apmc मध्ये महत्त्वाच्या कागदपत्रांची सुरक्षितता, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा कार्यालयातील प्रवेश आणि फाईल्सची परवानगीशिवाय ने-आण झाली का, महत्त्वाची कागदपत्रे परवानगीशिवाय बाहेर गेल्याचे स्पष्ट झाल्यास APMC प्रशासन संबंधित व्यक्तीविरोधात पोलिसांत तक्रार करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.