राष्ट्रीय महत्वाचे बाजार मुंबई APMC मध्ये 230 सुरक्षा कर्मचारी! तरी बाजार असुरक्षित का?
राष्ट्रीय महत्वाचे बाजार मुंबई APMC मध्ये 230 सुरक्षा कर्मचारी! तरी बाजार असुरक्षित का?
राष्ट्रीय बाजार मुंबई APMC मध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तरी चोरी, अतिक्रमण, गुटखा आणि अनधिकृत प्रवेशाला आळा नाही
मुख्य सुरक्षा अधिकारी असूनही बाजार असुरक्षित? रात्री झाडे तोडली, चोरी-गुटखा-अतिक्रमणाला ऊत सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह
नवी मुंबई : राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई APMCच्या पाचही बाजारपेठांच्या सुरक्षेसाठी तब्बल २३० सुरक्षा अधिकारी व कर्मचारी तैनात असताना बाजार आवारातील सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरक्षा महामंडळाचे २१६ कर्मचारी, तर APMC आस्थापनेवरील १४ अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. या संपूर्ण यंत्रणेवर देखरेखीसाठी मुख्य सुरक्षा अधिकारी सी.टी. पवार आणि सुरक्षा अधिकारी वैभव रासकर यांची नियुक्ती आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही बाजारात चोरी, अनधिकृत प्रवेश, गुटखा विक्री, अतिक्रमणे, बेकायदा पार्किंग आणि अनधिकृत कार्यालयांचे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.
२३० जणांची सुरक्षा यंत्रणा, तरी रात्री झाडे तोडली कशी?
कांदा-बटाटा बाजारातील होर्डिंगजवळील आठ झाडे रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींनी तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या परिसरात सुरक्षा कर्मचारी तैनात असतानाही हा प्रकार सुरक्षा यंत्रणेच्या निदर्शनास तातडीने आला नसल्याचा आरोप आहे. मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांकडून ‘नंतर माहिती मिळाली’ असे सांगितले जात असल्याने, इतकी मोठी सुरक्षा यंत्रणा असताना प्रत्यक्ष नियंत्रण नेमके कुठे आहे?, असा सवाल उपस्थित होत आहे.
या प्रकरणात बाजारातील काही सूत्रांकडून गंभीर आरोप केले जात असले, तरी त्याची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे. झाडे तोडण्याच्या घटनेची माहिती सुरक्षा विभागाला नेमकी कधी मिळाली, घटनास्थळी कोणत्या कर्मचाऱ्यांची ड्युटी होती आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले का, याची माहिती प्रशासनाने स्पष्ट करणे गरजेचे आहे.
कंटेनरला प्रवेश आजही कार्यालय सुरू?
भाजीपाला बाजारात एका पक्षाच्या कार्यालयासाठी कंटेनर बाजार आवारात आणल्याचा प्रकार यापूर्वी चर्चेत आला होता. संबंधित कंटेनरला बाजारात प्रवेश देताना सुरक्षा अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर हे कंटेनर आजही अनधिकृत कार्यालय म्हणून वापरले जात असल्याचा आरोप आहे.
जर कंटेनरला परवानगी नसेल, तर तो बाजार आवारात कसा आला आणि आजपर्यंत त्याच्यावर कारवाई का झाली नाही, हा प्रश्नही सुरक्षा विभागाच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवणारा ठरत आहे.
चोरीपासून गुटख्यापर्यंत बाजारात काय चाललेय?
APMCच्या विविध बाजारांमध्ये खालील प्रकारांबाबत व्यापारी व बाजारातील घटकांकडून सातत्याने तक्रारी होत असल्याचे सांगितले जाते—
* चोरीच्या घटना
* गुटखा व पानटपऱ्यांचा बेकायदा व्यवसाय
* गांजासह संशयास्पद हालचालींचे आरोप
* बेकायदा वाहन पार्किंग
* पॅसेज व धक्क्यांवर अतिक्रमण
* धक्क्यावर शेतमालाची विक्री
* फुटपाथवर स्टॉल
* हॉटेल चालकांकडून अतिक्रमण
* अनधिकृत कंटेनर कार्यालये
* फळ व भाजीपाला बाजारात अनधिकृत शेतमाल विक्री
* बाजार आवारात अनधिकृतपणे वास्तव्यास असणाऱ्यांची वाढती संख्या
यामुळे राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराची सुरक्षा व्यवस्था नेमकी कोणाच्या नियंत्रणाखाली आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गुन्हेगारांसाठी ‘आओ जाओ, घर तुम्हारा’?
काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रँचकडून घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली. त्यापैकी एका आरोपीचा दिवसा फळ बाजारात हमाली करण्याचा आणि रात्री बाहेरील भागात घरफोड्या करून बाजार परिसरात वास्तव्यास राहण्याचा आरोप असल्याची माहिती समोर आली आहे.
बाजारात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख, प्रवेश, वास्तव्य आणि नोंदणी यंत्रणा कितपत सक्षम आहे, हा या घटनेनंतर महत्त्वाचा प्रश्न ठरतो. बाजारात येणाऱ्या-जाणाऱ्यांची आणि वास्तव्यास असणाऱ्यांची अद्ययावत नोंद नसल्यास, एवढ्या मोठ्या बाजाराची सुरक्षा धोक्यात येऊ शकते.
कारवाई होते पण पुन्हा तेच प्रकार?
अन्न व औषध प्रशासनाकडून पानटपऱ्यांवर कारवाई करण्यात आल्यानंतरही काही ठिकाणी पुन्हा गुटख्याचा व्यवसाय सुरू होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे एका विभागाने कारवाई करायची आणि दुसऱ्या बाजूने सुरक्षा यंत्रणेने त्यावर नियंत्रण ठेवायचे, या दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा बाजारात आहे.
२२ सुरक्षा कर्मचाऱ्यांवर कारवाई मग मुख्य जबाबदारी कुणाची?
कामचुकारपणा अथवा गैरप्रकारांच्या तक्रारीनंतर तत्कालीन सचिवांनी २२ सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोर्डावर पाठविण्याची कारवाई केल्याचे सांगितले जाते. मात्र, सुरक्षा यंत्रणेचा प्रमुख अधिकारी म्हणून मुख्य सुरक्षा अधिकाऱ्याच्या नियंत्रणाची आणि जबाबदारीचीही तपासणी होणे आवश्यक आहे, अशी मागणी बाजारातील घटकांकडून होत आहे.
तक्रार आल्यानंतर विशिष्ट कर्मचाऱ्यांवरच कारवाई करण्याऐवजी त्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याचीही जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, अशी मागणी पुढे येत आहे.
ACच्या दालनातून सुरक्षा कशी सांभाळणार?
मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना APMCकडून मोठे वेतन दिले जात असताना प्रत्यक्ष पाचही बाजारांची नियमित पाहणी, सुरक्षा तपासणी, रात्रीची गस्त, अनधिकृत प्रवेशावर नियंत्रण आणि अतिक्रमणांवर कारवाई होते का, याची तपासणी करण्याची गरज आहे.
बाजारातील चर्चेनुसार, मुख्य सुरक्षा अधिकारी प्रत्यक्ष बाजार पाहणीपेक्षा कार्यालयीन कामकाजात अधिक वेळ देत असल्याचे आरोप होत आहेत. तसेच काही सुरक्षा कर्मचारी राजकीय पदाधिकारी, माजी बाजार संचालक किंवा माजी अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचीही चर्चा आहे. या आरोपांची प्रशासनाने वस्तुनिष्ठ चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
राजकीय दबावामुळे कारवाईला ब्रेक?
एखाद्या सुरक्षा कर्मचाऱ्यावर कारवाई झाल्यानंतर मंत्रालयापासून आमदारांपर्यंत फोन येत असल्याची चर्चा बाजार आवारात आहे. मात्र, या दाव्याची स्वतंत्र पुष्टी झालेली नसल्याने त्याची सत्यता तपासणे आवश्यक आहे. जर अशा प्रकारचा दबाव प्रत्यक्षात असेल, तर सुरक्षा यंत्रणेच्या शिस्तीवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
राष्ट्रीय बाजार झाला पण नियंत्रण आले का?
मुंबई APMCला राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा दर्जा मिळाल्यानंतर बाजाराची प्रशासकीय आणि सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम होणे अपेक्षित आहे. मात्र, पाचही बाजारांमध्ये अनधिकृत व्यवसाय, अतिक्रमण, चोरी, बेकायदा पार्किंग, गुटखा विक्री आणि अनधिकृत वास्तव्याच्या तक्रारी कायम असल्यास राष्ट्रीय बाजाराचा दर्जा आणि प्रत्यक्ष सुरक्षा व्यवस्था यामध्ये मोठी तफावत आहे का?, असा सवाल उपस्थित होतो.
सुरक्षा रक्षक २३० तरी बाजार ‘रामभरोसे’?
मुख्य सुरक्षा अधिकारी ,सुरक्षा अधिकारी २३० सुरक्षा कर्मचारी, अशी मोठी यंत्रणा APMCकडे असताना बाजारात रात्री झाडे तोडली जातात, चोरीच्या घटना घडतात, अनधिकृत कंटेनर कार्यालये सुरू राहतात, गुटखा विक्रीवर नियंत्रण राहत नाही आणि अतिक्रमणे वाढत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे प्रश्न केवळ सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संख्येचा नाही, तर त्यांच्यावर प्रभावी नियंत्रण कोण ठेवते? हा आहे.
सुरक्षा यंत्रणेत अनेक वर्षांपासून कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्या, ड्युटीचे फेरबदल, रात्रीची अचानक तपासणी, प्रवेश नोंदणी, बाजारातील रहिवाशांची पडताळणी, सीसीटीव्हीचे प्रभावी निरीक्षण आणि प्रत्येक घटनेची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार सुरक्षित ठेवण्यासाठी ‘२३० सुरक्षा कर्मचारी’ पुरेसे आहेत की ‘जबाबदार आणि उत्तरदायी सुरक्षा व्यवस्था’ आवश्यक आहे? याचे उत्तर APMC प्रशासनाला द्यावे लागणार आहे.