इजिप्तच्या कांद्यावरून राजू शेट्टी आक्रमक, ‘बंदरातील ४०० कंटेनरना जलसमाधी द्या’
मुंबई APMCत दोन कंटेनर दाखल आणखी ४०० कंटेनर बंदरात असल्याचा दावा
नवी मुंबई : दुष्काळाच्या संकटातून कसेबसे वाचवलेल्या कांद्याला आता परदेशी कांदा आयातीचा फटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) इजिप्तमधून आयात केलेले दोन कंटेनर कांदे दाखल झाले असून, जवळपास ४०० कंटेनर कांदा बंदरात असल्याचा दावा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारला तीव्र इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांना सध्या त्यांच्या कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळत असताना परदेशातून कांद्याची आयात करण्यात येत असल्याने स्थानिक बाजारभावावर परिणाम होण्याची शक्यता शेट्टी यांनी व्यक्त केली. ‘दुष्काळाने आधीच शेतकरी हैराण आहे. त्यातून वाचलेल्या पिकावरही सरकार सुरी फिरवणार का?’, असा सवाल त्यांनी केला.
इजिप्तमधून आलेला कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात दाखल झाल्यास कांद्याचे दर घसरण्याची आणि त्याचा थेट फटका कांदा उत्पादकांना बसण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. ‘आम्ही शेतामध्ये इमानेइतबारे काम करायचे तरी कशासाठी? उद्ध्वस्त होण्यासाठी आणि आत्महत्या करण्यासाठीच का?’, असा संतप्त सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.
दरम्यान, बंदरात असलेल्या कथित ४०० कंटेनर कांद्याच्या आयातीवरून त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला. ‘हे ४०० कंटेनर बंदरातच थांबवले पाहिजेत गरज पडल्यास त्यांना जलसमाधी देण्याचे आंदोलन हातात घ्यावे लागेल,’ असे आवाहन त्यांनी कांदा उत्पादकांना केले.
कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने आयातीबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. इजिप्तच्या कांद्याची आवक वाढल्यास देशांतर्गत कांद्याच्या बाजारभावावर नेमका किती परिणाम होतो, याकडे आता कांदा उत्पादकांचे लक्ष लागले आहे.