मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांची चिंता मिटणार का ?
मुबई: मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्या राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्या मंजुरी मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू करण्यात येणार आहे. राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात घोषणा केली होती.
राज्य मंत्रिमंडळाची उद्या महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंजुरी देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना आता 12 हजारांचा निधी मिळणार
केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपयांची निधी देते. त्याच धर्तीवर राज्य सरकारही शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6 हजार रुपये देणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्यातील शेतकरी कुटुंबांना केंद्र आणि राज्य सरकार मिळून एकूण 12 हजारांचा निधी मिळणार आहे. नमो शेतकरी महासन्मान योजनेचा राज्यातील 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. केंद्र सरकारच्या योजनेचा ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळतोय त्याच शेतकऱ्यांना राज्य सरकारचाही लाभ मिळणार आहे.