तुफान पावसाचा इशारा! मुंबईसह 4 जिल्ह्यांत रेड अलर्ट; अनेक शहरांतील शाळांना सुट्टी, प्रशासन सतर्क
4 ते 7 जुलैदरम्यान कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हेल्पलाईन क्रमांक जारी, नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन
Maharashtra rain update :
राज्यभरात पावसाने पुन्हा जोरदार पुनरागमन केले असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. 4 ते 7 जुलैदरम्यान कोकण किनारपट्टीवर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
या पार्श्वभूमीवर नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर आणि कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर यांच्यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
सततच्या पावसामुळे सखल भागांत पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे, झाडे उन्मळून पडणे तसेच काही ठिकाणी संरचनात्मक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी नदी, नाले आणि समुद्रकिनाऱ्याजवळ जाणे टाळावे तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, मुंबई महानगर प्रदेशातील विविध आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून हेल्पलाईन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तत्काळ संबंधित प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 7 जुलैपर्यंत कोकण आणि मुंबई महानगर परिसरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.