BREAKING | हालचाली वाढल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होणार, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
 
मुंबई | 21 जुलै 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज रात्री आठ वाजता दिल्लीच्या दिशेला रवाना होणार असल्याची मोठी बातमी सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत एनडीएची बैठक बोलावली होती. या बैठकीला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गेले होते. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आसनव्यवस्था विशेष ठिकाणी करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रांगेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मधोमध एकनाथ शिंदे यांची बैठकीत बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली. तर अमित शाह यांच्या बाजूला अजित पवार बसले होते.
या बैठकीनंतर मुख्यमंत्री विमानतळाच्या दिशेला निघाल्यानंतर अजित पवार आणि अमित शाह, नरेंद्र मोदी आणि जे. पी. नड्डा यांच्यात अर्धा तास बैठक पार पडल्याची माहिती समोर आलेली. अजित पवार आणि नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यात बैठक झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री दिल्लीच्या दिशेला रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे त्यांच्या या दिल्ली दौऱ्यात दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे आज संध्याकाळी अधिवेशन संपल्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास दिल्लीला रवाना होतील.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला एका खासगी कार्यक्रमासाठी उपस्थिती लावणार आहेत. त्यानंतर ते पुन्हा मुंबईसाठी रवाना होणार आहेत. या दरम्यान त्यांची भेटगाठ होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.