महाराष्ट्रात आता दोन अर्थमंत्री होण्याची शक्यता, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकरणात कधी काय घडेल? याचा काहीच भरोसा नाही. राज्याच्या राजकारणात सातत्याने सर्वसामान्यांना धक्क्यावर धक्के देणाऱ्या आणि अवाक करणाऱ्या अशा घडामोडी घडत आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर राज्याला पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री मिळाले. त्यानंतर आता अशीच एक नवी अनोखी गोष्ट घडण्याचे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्रात आता दोन अर्थमंत्री असणार आहे. सूत्रांकडून याबाबतची सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा तिढा सुटत नसल्याने अजित पवार आज दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि मंत्री हसन मुश्रीफ हे देखील दिल्लीला गेले आहेत. अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास शिवसेनेचा विरोध आहे. याशिवाय आणखी दोन खात्यांवर तिढा निर्माण झाला आहे. असं असताना आता चर्चेतून मधला मार्ग निघण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याला दोन अर्थमंत्री मिळणार आहेत. या दोन्ही मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असेल. तसेच दोघांना समसमान अधिकार असणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या शपथविधीला 9 दिवस उलटूनही खातेवाटप नाही
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार गेल्या अनेक दिवसांपासून रखडला आहे. राज्यात सत्तांतर होऊन आता वर्ष उलटलं आहे. पण तरीही राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार झालेला नाही. अशा परिस्थितीत सत्ताधारी आमदारांचं मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष आहे. विशेषत: शिवसेना आमदारांचं याकडे जास्त लक्ष आहेत. शिवसेनेच्या अनेक आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. पण असं असताना काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार सत्तेत सहभागी झाले. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या नेत्यांचा शपथविधी पार पडून 9 दिवस उलटून गेले आहेत. पण अद्यापही त्यांचं खातेवाटप झालेलं नाही.
मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर दिल्लीत अंतिम निर्णय होणार?
खातेवाटप न होण्यामागे काही कारणं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ खातं हवं आहे. पण शिवसेनेचा अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास विरोध आहे. महाविकास आघाडी सरकार असताना अजित पवार यांच्याकडे मंत्रीपद होतं. त्यावेळी त्यांनी निधी वाटपात भेदभाव केला होता, असा शिवसेना आमदारांचा आरोप आहे. तशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, अशी शिवसेना आमदारांची भूमिका आहे. याशिवाय भरत गोगावले रायगड जिल्ह्याच्या मंत्रिपदासाठी आग्रही आहेत. पण अदिती तटकरे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे हा एक तिढा निर्माण झाला आहे. याशिवाय भाजपदेखील काही खाती देण्यास तयार नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या तिढ्यावर आता दिल्लीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.