मुंबई APMC कांदा-बटाटा मार्केटमधील वादाने; कांदा दरवाढीचे संकेत
माथाडी कामगार बेरोजगारीच्या दिशेने
मुंबई APMC मार्केटमधील माथाडी कामगार आणि व्यापारी यांच्यातील ५० किलो वजनाचा वाद काल पुन्हा उद्भवला आहे. त्यामुळे काल कांदा-बटाटा मार्केटमध्ये ५० किलो वजनाचा अधिक आलेला माल उतरवण्यात आला नाही. परिणामी अधिक वजनाच्या गोणी असलेली वाहने मार्केट परिसरात पडून राहिली आहेत. मात्र, कालच्या वादाचा मोठा फटका आजच्या बाजारात येणाऱ्या आवकवर झाल्याचे पाहायला मिळाले. तर प्रतिदिन जवळपास २०० गाडी येणारी आवक १०० गाडीवर आली आहे. शिवाय मार्केट बाहेर उभ्या राहिलेल्या गाड्यांमधून बाहेरच्या बाहेर गोणी खाली करून इतर ठिकाणी विक्रीसाठी नेल्या जात आहेत. त्यामुळे माथाडी कामगार आणि व्यापारी या दोन्ही घटकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार असल्याचे दिसत आहे. तर "तुला नाही, मला आणि घाल कुत्र्याला" या म्हणी प्रमाणे मार्केट बाहेरील कामगार आणि व्यापारी याचा फायदा उचलत असल्याचे दिसत आहे.
मुंबई APMC कांदा-बटाटा मार्केटमध्ये आज १०१ गाडी आवक   झाली असून २५ ते ३० रुपये दराने कांदा विक्री होत आहे. मात्र आज देखील ५० किलो वजनाचा शेतमाल खाली न झाल्याने जवळपास ७० ते ८० शेतमाल वाहने मार्केटमध्ये प्रवेश न दिल्याने रस्त्यावर उभी आहेत. त्यामुळे मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. तर बाहेरचे मजूर मात्र या गोणी खाली करत असल्याचे सांगण्यात आल्याने बाहेरच्या मजुरांना या वादाचा फायदा होताना दिसत आहे. उद्या निम्याने आवक कमी झाल्यास अनेक माथाडी कामगार बेरोजगार होतील. याला जबाबदार कोण? असा सवाल बाजार घटक करत आहेत. तर या विषयात बाजार समिती सभापती आणि मार्केट सचिव काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  
तर हा वाद असाच सुरु राहिला तर येत्या काही दिवसात भरमसाठ कांदा दरवाढ होऊन मुंबईकरांना देखील याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर उत्तरप्रदेशातील आग्रा येथून ३० टन बटाटा मार्केटमध्ये आला आहे. मात्र, या गाडीत ५४ किलो वजनाच्या गोणी असल्याने या गाडीला मार्केटमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. तर ज्या ठिकाणी माल टाकण्याच्या सूचना येतील त्या ठिकाणी आम्ही माल खाली करू. तर ५० किलोचा वाद आम्हाला माहिती होता. मात्र अधिक वजनाचा माल आणण्यासाठी व्यापाऱ्यांनी संमती दिल्याने आम्ही घेऊन आलो असल्याचे वाहन चालक प्रजापती यांनी सांगितले.